- ऋजुता लुकतुके
एका कॉलेज कुमाराने ते ट्वीट करताना पुढे काय होईल याचा विचारही केला नसेल. पण, त्याला चक्क कंपनीच्या संस्थापकाकडूनच प्रतिसाद मिळाला. कसा ते पाहा. यश आचार्या या कॉलेज तरुणाने झेप्टो या ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या पोर्टलमध्ये प्रोडक्ट डिझाईन विभागात इंटर्न पदासाठी आपला अर्ज पाठवला होता. पण, त्याला कल्पनाही नव्हती की झेप्टोचे अब्जाधीश सहसंस्थापक त्याच्या एका ट्विटवरून त्याचा बायोडाटा थेट मागून घेतील. झालं असं की यश आचार्याचं ट्विट सोशल मीडिया साईट ट्विटरवर हळू हळू व्हायरल होत गेलं. आणि शेवटी ते झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य व्होरा यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी ते पाहून यशचा बायोडाटाच मागवून घेतला.
(हेही वाचा – Onion Price : कांद्याच्या वाढत्या दरावर केंद्र सरकारचा उपाय, निर्यातीवर लागणार ४० टक्के शुल्क)
असं काय होतं यशच्या ट्विटमध्ये?
२२ वर्षीय विद्यार्थी यशने झेप्टो पोर्टलवर प्रोडक्ट डिझाईन विभागात ट्रेनी किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज केला होता. हा अर्ज त्याने लिंक्ड-इन या सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून केला होता. आणि त्याचवेळी यशने कंपनीच्या मासिक न्यूजलेटरसाठीही नोंदणी केली. पुढच्याच महिन्यात त्याला ईमेलने कंपनीचं न्यूजलेटर आलं. या न्यूजलेटरचा मथळा होता, ‘झेप्टोचा डिलिव्हरी बॉय (मुंबई) म्हणून तू अगदी योग्य असशील!’ यशने अर्ज केलेल्या पदापेक्षा हे पद अर्थातच वेगळे होते. कामाचं स्वरुपच वेगळं होतं. पण, यशला यात विनोदाची संधी दिसली. आणि त्याने न्यूजलेटरचा हा मथळा ट्वीट करताना स्वत:चा मजेशीर संदेश लिहिला, ‘पण, मी तर प्रॉडक्ट डिझाईन पदासाठी अर्ज केला होता!’
Par maine to product designer ke liye apply kiya tha🙄 pic.twitter.com/R1yBJHd8LB
— yash (@yashachaarya) August 16, 2023
हे विनोदी ट्विट आतापर्यंत हजारो लोकांनी वाचलंय. आणि ते व्हायरलही झालंय. पण, म्हणता म्हणता ते पोहोचलं झेप्टोचे सहसंस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी कैवल्य व्होरा यांच्यापर्यंत. कैवल्य हे स्वत: फक्त २० वर्षांचे तरुण आहेत. गेल्याच वर्षी व्होरा वेल्थ हरुनच्या यादीत देशातले सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून झळकले आहेत. त्यांच्यापर्यंत हे ट्विट पोहोचल्यावर त्यांनी यशला ट्विटरवरच लिहिलं की, ‘तुझं ट्विट पाहिलं. तू मला तुझा बायोडेटा पाठवशील का?’ अर्थात, यशने तो पाठवला. यश कोटा शहरात राहतो. आणि सध्या जालंधरच्या एनआयटी विद्यालयातून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. पण, त्याला प्रोडक्ट डिझाईनमध्ये रस आहे. यशच्या त्या ट्विटनंतर कैवल्य ट्विटरवर त्याला फॉलोही करायला लागले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community