लॉकडाऊनने मुलांचे हस्ताक्षर केले खराब!

126

गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध भागांत शाळा सुरु झाल्यानंतर मोकळ्या वातावरणात शाळा सुरु झालेल्या मुलांना अक्षर ओळखीचा प्रचंड त्रास होत आहे. सतत दोन वर्ष ऑनलाईन वर्गातून वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करताना हातात पेन्सिलच धरली नसल्याने त्यांच्या हस्ताक्षरांमध्येही भयंकर चुका दिसून येत असल्याचे शिक्षकवर्गाची तक्रार आहे. दिवसभर वर्क फ्रॉम कोणत्याही योजनेअगोदरच कर्मचा-यांवर लादले गेले. परिणामी नोकरदार मंडळी मुलांच्या घरच्या अभ्यासक्रमाकडे फारशी लक्ष देऊ शकली नाही.

ऑनलाईन शाळेत मोठा शिशु आणि पहिलीत पोहोचलेल्या मुलांना गेल्या दोन वर्षांत मूलभूत अक्षर ओळखीचा फारसा सरावच झालेला नसल्याचे शिक्षकांच्या पाहणीत आढळले आहे. लिखाणात असंख्य चुकांचा भडिमार दिसून येत असल्याचे शिक्षक सांगतात. या मुलांकडून फार सराव करुन घ्यावा लागेल. शिवाय मुलांची आकलनक्षमताही मंदावल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले. पालकांनी सतत शिक्षकांच्या संपर्कात राहिले तर ऑनलाईन शाळेच्या ट्रेण्डमधून बाहेर येत मुलांना दैनंदिन शालेय जीवनात पूर्णपणे रुजवायला मदत होईल, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली.

काय झाले आहेत परिणाम 

  • नर्सरीत दोन तास एका जागे बसायची सवयच शिकवली नसल्याने मुलांना एका जागी बसणे कठीण होऊ लागले आहे. ही मुले सतत इतर मुलांशी भांडण, रडारड करत आहेत.
  • प्राथमिक इयत्तेत शिकणा-या मुलांमध्ये लिहिताना भयंकर चूका आढळून येत आहेत. त्यांचे हस्ताक्षर बिघडले. व्याकरणाच्याही चुका होत आहेत. स्वतःची माहिती देणाऱ्या स्पेलिंगही मुले लिहीत नाहीत.
  • माध्यमिक शाळेतील पौंगडावस्थेतील मुलांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येत आहे.  शिवाय त्यांना आता अभ्यासात फारशी रुची दिसून येत नाही आहे.

लॉकडाऊनमध्ये मुले घरात कशी वावरत होती

मुलांमध्ये चिडचिडेपणा आला. मुले प्रत्येक गोष्टीवर टोकाची प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येक घटनेवर किंचाळणे, आदळआपट करणे अशा पालकांच्या तक्रारी क्लिनिकल सायकोलोजिस्ट्सकडे नोंदवल्या गेल्यात.

सर्व वयोगटातील मुलांवर दिसून आलेले बदल

लॉकडाऊनच्या काळात सर्व वयोगटातील मुले दोन वर्ष घरात होती. ही सर्व मुले संभाषणात आता कमकुवत दिसून येत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले आहेत. मुलांची भावनिक आणि सामाजिक जडणघडण खुंटली आहे. शाळेअगोदर आपल्याकडे प्रीस्कूल ही संकल्पना मुळात मुलांना शालेय वातावरणाशी समरस करायला दिली जाते. तीच लहान मुलांना मिळाली नाही. त्यांना आता होणार नॉर्मल शाळेत जाण्याचा बदल अंगिकारायला वेळ लागेल. पालकांनी एकमेकांशी संपर्क वाढवून मुलांना घरी बोलावून छोटेखानी बेत आखावेत जेणेकरून मुले एकमेकांशी मिसळतील, असे घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील नवजात रोग विशेतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ, डॉ श्रुती घटालीया यांनी सांगितले.

अन्य निरीक्षणे 

० लॉकडाऊनमुळे घरात एकाच जागी बसण्याची बहुतांश मुलांना सवय झाली. त्यांना आता शाळेत जायचे नाही आहे, माध्यमिक मुलांमध्ये शिक्षणाची ओढ राहिलेली नाही. त्यांना गमावलेल्या दोन वर्षांतील खोड्या भरुन काढण्याकडे कल आहे.
० काही मुलांनी या काळात विविध छंद जोपासले. चित्रकला, पाककृती, कोरीवकाम तसेत विविध खेळ खेळण्यातही मुलांना वेळ व्यतीत केला. परंतु त्यांना आता समाजात मिसळताना अडचणी येत आहेत. या मुलांनी स्वतःचा कम्फर्ट झोन तयार केला आहे.

काही मुलांनी लॉकडाऊन काळात स्वतःचा कम्फर्ट झोन तयार केला. ही मुले समाजातील विविध कार्यक्रमात मिसळायला तयार नसतील तर पालकांनी वेळीच सजग व्हावे. शिक्षकांनीही शालेय उपक्रमात वैविध्यता आणावी, जेणेकरून मुलांना शाळा हवीहवीशी वाटेल. त्यांना शालेय जीवनाचा आनंद घेता येईल, असे कार्यक्रम शिक्षकांनी हाती घ्यावे. या मुलांना हाताळण्यासाठी पालकांमध्येही बदल घडणे गरजेचे आहे. मुलांमागे सतत आरडाओरड, तक्रारींचा सूर पालकांमध्ये नसावा उलट त्यांच्याशी मित्रत्वाने वागावे. मुलांसाठी पालकांनीही एकमेकांशी भेटून छोट्या पार्ट्यांचे आयोजन करावे. जेणेकरुन मुले एकमेकांमध्ये चांगली मिसळतील, असे क्लिनिकल सायकॉलोजिस्ट डॉ सुमित शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.