राज्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले पहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताची भीती हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान शालेय उन्हाळी सुट्ट्यांना आता सुरूवात झाली आहे परंतु विद्यार्थ्यांचे निकाल एप्रिलच्या अखेरिस किंवा मे महिन्याच्या सुरूवातीला जाहीर करण्यात येणार आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे निकाल २९ एप्रिल किंवा मे महिन्यात जाहीर केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : अवकाळीचे संकट! विदर्भासह मराठवाड्यात गारपीटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?)
शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश
निकालानंतर प्रगतीपुस्तके घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, असे आदेश राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज जिल्ह्याचे तापमान सरासरी ४० सेल्सिअस अंशापर्यंत आहे. दरवर्षी २९ एप्रिल ते १ मे दरम्यान शाळांचे निकाल प्रसिद्ध होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना शाळांमध्ये बोलावून त्यांची प्रगतीपुस्तके दिली जातात.
( हेही वाचा : महापालिकेचे विद्यार्थी शाळांच्या गच्चीवर करणार शेती, पिकवलेली भाजी वापरणार मध्यान्ह भोजनात)
प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सतर्क
खारघर घटनेनंतर आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभागाने शाळांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रगतीपुस्तके घरपोच करतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community