विरारमध्येही फिरतोय जखमी बिबट्या

229

विरार येथील कोपर गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. विरारमध्ये कोपर गावात पहिल्यांदाच बिबट्या आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बिबट्याच्या एका पायाला जखम झाली असून तो लंगडत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. वनविभागाच्या कॅमेऱ्यातही बिबट्याच्या एका पायाला जखम झाल्याचे दिसत आहे. शिकारीसाठी जंगलात लावलेल्या तारेच्या फासात अडकल्यानंतर स्वतःची सुटका करत असताना तो जखमी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

( हेही वाचा : १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ३ हजार ६०३ पदांची भरती )

छायाचित्र देण्यास वनविभागाचा नकार

बिबट्या दिसल्याने घाबरुन जाऊ नका, वनविभाग घटनास्थळी आवश्यक काळजी घेत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हा बिबट्या एका नागरी वसाहतीच्या पाण्याच्या टाकीवर दिसला. त्यानंतर वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली. मात्र बिबट्या लोकांची गर्दी पाहत शांतपणे लंगडतच गर्दीपासून दूर गेला. शुक्रवारीच वनविभागाने या भागांत बिबट्या असल्याची खातरजमा करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावला होता. त्यावेळी बिबट्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आला. त्याच्या एका पायालाही जखम झाल्याचे वनाधिका-यांना आढळले. बिबट्याचे छायाचित्र देण्यास वनविभागाने नकार दिला आहे.

बिबट्याच्या एका पायावर गंभीर जखम असल्याचे कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आले आहे. बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. जखमी असल्याने तो सहज उपलब्ध होणा-या कोंबड्या आणि कुत्र्यांना पकडण्यासाठी नागरी वसाहतीत सतत येत आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे माणसांवर हल्ला होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद केले जाईल.
– विजय बारब्दे, प्रमुख, वन्यप्राणी बचाव पथक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.