शांती मिळवण्यासाठी ‘ती’चे टोकाचे पाऊल

135
“मला शांती हवी आहे” अशी चिठ्ठी लिहून एका नवख्या मॉडेल तरुणीने मुंबईतील एका हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरातील वर्सोवा येथील हॉटेलच्या खोलीत गळफास अवस्थेत सापडलेल्या मॉडेलच्या मृत्यूप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
आकांक्षा मोहन असे या मॉडेलचे नाव आहे. तीस वर्षांची ही तरुणी मुंबईत मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमावत होती. मुंबईतील अंधेरी लोखंडवाला संकुल येथे भाडेतत्वावर राहणाऱ्या आकांक्षा मोहन हीने बुधवारी दुपारी वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती. बुधवारी संध्याकाळपासून तिच्या खोलीतून कुठलीही हालचाल होत नसल्यामुळे गुरुवारी हॉटेल व्यवस्थापनाला संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले.
वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दार आतून बंद असल्यामुळे पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला असता आकांशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट (मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी) सापडली. त्यात तीने  ‘मला माफ करा,  माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,  मी आनंदी नाही, दुःखी आहे  मला फक्त शांतता हवी आहे’, असे लिहिले आहे. वर्सोवा पोलिसांनी आकांक्षा हिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनसाठी कूपर रुग्णालयात पाठवला असून, याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, तिने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले कारण तिच्या चिठ्ठीत ती “दु:खी” होती आणि तिला “शांती” हवी होती असे लिहिण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.