मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेचा असा आहे थेट संबंध!

माने ४ मार्च रोजी कार्यलयात नव्हता, तसेच त्याने त्या दिवशी सरकारी आणि त्याचे खाजगी वाहन वापरले नसल्याचे समोर आले आहे.

88

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलिस निरीक्षक सुनील माने, याचा थेट संबंध असल्याचे पुरावे एनआएच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात एनआयएने सुनील माने याच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून असणाऱ्या पोलिस शिपायाचा जबाब नोंदवला आहे. या चालकाकडे असणारी नोंदवही ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

काय घडले त्या रात्री?

मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटमध्ये प्रभारी पोलिस निरीक्षक असताना, सुनील माने याने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेला मदत केल्याचे समोर आले आहे. मनसुखला हत्येच्या दिवशी तावडे नावाने फोन करुन, घोडबंदर रोड वरील गायमुख वाडी येथे सुनील माने यानेच भेटायला बोलावले होते. त्याआधी सुनील माने हा खाजगी पोलो वाहनातून कळवा रेल्वे स्थानक येथे, सचिन वाझेला घेण्यासाठी गेला होता. कांदिवली युनिट मधून निघण्यापूर्वी माने याने आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करुन कार्यालयात ठेवून दिला असल्याचे, एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

(हेही वाचाः सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी!)

माने ४ मार्च रोजी कार्यालयात नव्हता

एनआयएच्या पथकाने या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिट येथून माने यांच्या सरकारी वाहनावरील वाहन चालक पोलिस शिपायाचा जबाब नोंदवला आहे. त्याच्या जवळील सरकारी वाहनाने सुनील माने कुठे-कुठे गेला होता याची नोंदवही ताब्यात घेतली आहे. या चौकशीत माने ४ मार्च रोजी कार्यलयात नव्हता, तसेच त्याने त्या दिवशी सरकारी आणि त्याचे खाजगी वाहन वापरले नसल्याचे समोर आले आहे.

पुन्हा सिन रिक्रिएट करणार

सचिन वाझेला कळवा रेल्वे स्थानकातून घेऊन मानेने घोडबंदरच्या गायमुख चौपाटी परिसरातून, मनसुखला गाडीत बसवले. त्यानंतर काही अंतरावर पुढे जाऊन, विनायक शिंदे आणि आणखी काही लोक होते त्या गाडीत मनसुखला बसवण्यात आले. विनायक शिंदे असणाऱ्या गाडीतच मनसुखची हत्या करुन, त्याला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत फेकण्यात आले असल्याचा संशय एनआयएला आहे. एनआयए कडून या सर्व घटनाक्रमाचा पुन्हा एकदा सिन रिक्रिएट करण्यात येणार असल्याचे, एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचाः वाझेने कळव्यातील दुकानातून खरेदी केले होते ‘ते’ रुमाल!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.