आता कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणार पोलिस दलातील ‘सुपर सेव्हर्स’!

मुंबईतील हे सुपर सेव्हर्स प्रत्येक पोलिस ठाण्यात तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची सर्वतोपरी मदत करण्यासाठी मुंबई पोलिस दलात ३०० सुपर सेव्हर्स तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करुन त्यांचे प्राण वाचवणे हे सुपर सेव्हर्सचे कार्य असेल. मुंबईतील हे सुपर सेव्हर्स प्रत्येक पोलिस ठाण्यात तैनात करण्यात येणार आहेत.

सुपर सेव्हर्सना दिले जाणार प्रशिक्षण

आरोग्यसेवेच्या अभावी कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला मदत करण्यासाठी मुंबईसह राज्यातील पोलिस दलात ‘सुपर सेव्हर्स’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यासह मुंबई पोलिस दलातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन सुपर सेव्हर्स नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी आणि एका पोलिस अंमलदार यांची निवड करण्यात येणार आहे. या सुपर सेव्हर्सची माहिती तात्काळ मागवण्यात आली असून, ही नावे केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थेकडे पाठवली जाणार आहेत. ही संस्था पोलिस दलात सुपर सेव्हर्स तयार करुन, राज्यभर त्यांना आरोग्यसेवेसाठी तयार करणार आहे.

(हेही वाचाः सचिन वाझेची पोलिस दलातून हकालपट्टी! मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश)

अशी असणार योजना

एकट्या मुंबई पोलिस दलात ३०० सुपर सेव्हर्स असतील व हे सुपर सेव्हर्स मुंबईतील आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला मदत करतील. प्रत्येक पोलिस ठाण्यात २ सुपर सेव्हर्स असतील आणि ते आरोग्य सेवा पुरवठा केंद्र यांच्या संपर्कात असतील. या संस्थेकडून पोलिसांना बदलत्या कोरोना संक्रमणाबाबत माहिती देऊन त्यांना कोरोना रुग्ण हाताळणे, आरोग्य सेवेला मदत करणे, घरी विलगीकरणात असणाऱ्यांची माहिती आरोग्य सेवेला देणे, लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण सुपर सेव्हर्स यांना देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here