रजनीकांत (Rajanikanth) यांना कोण नाही ओळखत. तामिळ चित्रपटसृष्टीवर जणू ते अधिराज्य गाजवत आहेत. इतकंच काय तर तामिळ लोक त्यांना देवासमान मानतात. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आज १२ डिसेंबर म्हणजे रजनीकांत यांचा वाढदिवस.
तुम्हाला माहितीच असेल की रजनीकांत (Rajanikanth) यांचे खरे नाव शिवाजीराव सामोजीराव गायकवाड असे आहे. होय! ते मूळचे मराठी भाषिक आहेत. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव आणि आईचे नाव जिजाबाई. ते मूळचे पुण्याचे. त्यांच्या पत्नीचे नाव लता रंगाचारी असे असून ऐश्वर्या आणि सखुबाई उर्फ सौंदर्या ह्या दोन मुली आहेत.
लहानपणी त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्यांचे शिक्षण बंगळुरु येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध कामे केली. त्याचबरोबर बंगळुरु येथे बससेवेत ते कंडक्टर म्हणून काम करत होते. कंडक्टर असताना ते तोंडाने विशिष्ट प्रकारे शिट्टी वाजवायचे आणि ही त्यांची वेगळी कला खूपच लोकप्रिय ठरली. लोकांनी त्यांना सांगितले की तू हीरो होऊ शकतोस. मग ते अभिनय शिकण्यासाठी चेन्नईला गेले. मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमधून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी १९७४ मध्ये सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि उदयाला आला एक सुपरस्टार – रजनीकांत.
त्यांनी अपूर्व रागंगल या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले आणि अशाप्रकारे एक मराठी माणूस तामिळनाडूचा थलैवा म्हणजेच सुपरस्टार झाला. त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
आजही वयाच्या ७२ व्या वर्षी ते चित्रपटात नायकाची भूमिका करतात आणि त्यांचे चित्रपट चांगले चालतात. रजनीकांत (Rajanikanth) या नावातच जादू आहे. त्यांचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. त्यांचा चित्रपट हमखास हाऊसफुल्ल होतो. २००७ मध्ये शिवाजी द बॉस या चित्रपटासाठी ते भारत आणि आशियातील सर्वाधिक मानधन घेणारे हीरो ठरले. विशेष म्हणजे त्यांचे अनेक फॅनक्लब्स आहेत. रजनीकांत हे नाव आज जगाच्या इतिहासात कोरलं गेलं आहे.
Join Our WhatsApp Community