शिवसेना आणि धनुष्यबाण यांवर ठाकरे आणि शिंदे गटांनी दावा केला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
काय आहे पार्श्वभूमी
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत नव्याने सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यावर शिवसेनेने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
शिवसेनेच्या वतीने म्हटले आहे की, अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग होतो. त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने १ ऑगस्टला अन्य प्रकरणांवरील सुनावणींसोबत या विषयावरही सुनावणी घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाणावरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला फैसला होणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं. मात्र या सरकार विरोधात तसेच १६ आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्ययालयाची दारं ठोठावली होती. यानतंर तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्यानंतर या याचिकेवर २० जुलै, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वेळ देण्यात आला होता, त्यामुळे राज्यातील या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी होणार आहे.