गेल्या काही दिवसांपासून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. ही परीक्षा पुढे ढकला अशी मागणी करणारी याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
NEET-PG 2022 पुढे ढकलण्याची विनंती मान्य करता येणार नाही, कारण त्याचा रुग्णांच्या उपचार, सेवेवर आणि डॉक्टरांच्या करिअरवर परिणाम होईल, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की, रुग्णांवर उपचार आणि त्यांची सेवा करणे सर्वांत महत्त्वाचे आहे, अशा स्थितीत ही याचिका फेटाळली जाते.
Supreme Court rejects plea seeking to postpone National Eligibility cum Entrance Test for Postgraduate (NEET-PG 2022) examination pic.twitter.com/3UXaeugzNA
— ANI (@ANI) May 13, 2022
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर निकाल देताना असे म्हटले की, परीक्षा पुढे ढकलल्याने केवळ गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण होईल. परीक्षा पुढे ढकलल्याने निवासी डॉक्टरांची संख्या कमी होणार असून, त्याचा परिणाम रुग्णांच्या सेवेवर होणार आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी असे करणे चुकीचे ठरेल. NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता NEET PG परीक्षा वेळेवर होणार आहे. NEET PG परीक्षा 21 मे 2022 रोजी होणार आहे.
परीक्षेची तारीख बदला, IMA चे आरोग्यमंत्र्यांना पत्र
यावर्षी 21 मे रोजी होणाऱ्या NEET PG परीक्षेच्या 2022 च्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून NEET PG च्या परीक्षेची तारीख पुन्हा शेड्युल करण्याची विनंती केली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना लिहिलेल्या पत्रात 21 मे 2022 रोजी होणारी NEET परीक्षा पुन्हा शेड्यूल करण्यात यावी, असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community