भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश आणि न्यायाधीशांना त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक सेवा देण्यात येतात. निवृत्तीनंतर त्यांना मिळणा-या या सुविधांमध्ये संसदेची मान्यता घेऊन केंद्र सरकारकडून वेळोवेळी बदल करण्यात येत असतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांना मिळणा-या निवृत्तीनंतर मिळणा-या सुविधांमध्ये आता असेच बदल करण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश धरुन सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना आता त्यांच्या निवृत्तीनंतर एका वर्षासाठी 24 तास सुरक्षा मिळणार आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
अशा मिळतील सुविधा
केंद्र सरकारच्या न्याय विभाग व कायदा मंत्रालयाने सुधारित सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश नियम अधिसूचित केला आहे. यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एका वर्षासाठी कार चालकाची सुविधा आणि सचिवीय सहाय्य दिले जाणार आहे. तसेच सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीच्या तारखेपासून दिल्लीमध्ये सरकारी निवासस्थानाव्यतिरिक्त घर देखील मिळणार आहे.
टाईप-7 चा बंगला
सरन्यायाधीशांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यांसाठी दिल्लीत टाईप-7 घर मिळणार आहे. यापूर्वी केवळ माजी केंद्रीय मंत्र्यांनाच ही सुविधा देण्यात येत होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश व सरन्यायाधीशांना विमानतळावरील सेरोमोनिअल लाउंजमध्ये अभिवादन करण्याच्या प्रोटोकॉलसाठी उपस्थित राहता येणार आहे. तसेच सचिवालय सहायक देखील मदतनीस म्हणून निवृत्त न्यायाधीशांच्या सेवेत असणार आहेत.
Join Our WhatsApp Community