पुण्यातील भाड्याच्या घरात बनावट नोटांची छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना जेरबंद केले आहे. पप्पू भारत पवार (रा. कंदर, ता. करमाळा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
(हेही वाचा – आईची हत्या करून मृतदेह माथेरानच्या दरीत फेकला; मुलाला आणि नोकराला अटक)
आतापर्यंत पोलिसांनी पाचशे रुपयाच्या एक हजार १७३ बनावट नोटा (पाच लाख ८६ हजार ५०० रुपये) जप्त केल्या आहेत. कुर्डुवाडी-टेंभूर्णी रोडवरील बालोद्यान चौकात बनावट नोटांची बॅग घेऊन आलेल्या हर्षल लोकरे याला गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडले. त्याच दिवशी पोलिसांनी सुभाष काळे यालाही जेरबंद केले. त्यांच्या चौकशीवेळी कुर्डुवाडीतील किरणा दुकानदार गणेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर पुण्यातील एका भाड्याच्या खोलीत नोटांची छपाई सुरु होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेथून पोलिसांनी नोटांची छपाई करणारी मशीन (प्रिंटर, संगणक व इतर साहित्य) जप्त केले. त्याचवेळी पोलिसांनी तेथे पाचशेच्या १०० बनावट नोटांचा बंडल आढळला. ५९३ नोटा जप्त केल्यानंतरही पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. त्यानंतर या गुन्ह्यात आणखी एकाचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पप्पू पवार याला अटक केली. त्याच्याकडील तब्बल ५८० बनावट नोटा हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पोरे यांनी दिली.
सहा महिन्यांपासून नोटांची छपाई
हर्षल, सुभाष, गणेश व पप्पू हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुभाष काळे व गणेश शिंदे हे दोघे कुर्डुवाडीतील आहेत. तर हर्षल लोकरे व पप्पू पवार हे दोघे करमाळ्यातील कंदरचे रहिवासी आहेत. सुभाष व पप्पू हे दोघे एजंट म्हणून काम करीत होते. पुण्यात गेल्या सहा महिन्यांपासून नोटांची छपाई सुरू असून या बनावट नोटांची छपाई झाल्यानंतर ते दोघे नोटा बाजारात खपविण्याचे काम करीत होते. त्याबदल्यात त्यांना चांगले कमिशन दिले जात होते, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community