तीन तासांचा थरार,’ वंदे मातरम’ घोषणा देत घेतली इमारतीमधून उडी, तरुणाचा मृत्यू

135

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कठड्यावर चढलेल्या संशयित चोराला खाली उतरविण्यास पोलीस आणि अग्निशमन दलाला अपयश आले आहे. या संशयित चोराने पोलीस अटक करतील या भीतीने चौथ्या मजल्यावरून ‘वंदे मातरम’ घोषणा देत त्याने उडी घेतली त्यात त्याचा मृत्यु झाला. या संशयित तरुणाला सुखरूप खाली उतरविण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाने तीन तास प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. तीन तासांचा थरार तेथील राहिवाशांच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

( हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळविस्तार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच)

तरुणाला वाचवण्यास पोलीस,अग्निशमन दलाला अपयश 

या संशयित तरुणाचीओळख अद्याप पटलेली नाही. अंदाजे २५ ते वयोगटातील हा तरुण शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चर्चगेट येथील जयंत महल या रहिवाशी इमारतीत वॉचमनची नजर चुकवून आत शिरला होता, हा तरूण ड्रेनेज पाईपच्या आधारे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कठड्यावर चढला असता वॉचमनने त्याला बघताच चोर चोर म्हणून आरडा ओरड केला व पोलिसांना कळवले. वॉचमनचा आवाज ऐकून रहिवासी बाहेर आले त्यावेळी हा संशयित तरुण चौथ्या मजल्याच्या कठड्यावर कुणाच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत उभा राहिला. काही वेळातच मरीन ड्राईव्ह पोलीस या ठिकाणी दाखल झाले.

पोलिसांनी त्याला खाली येण्यास सांगितले, मात्र पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने तो खाली उतरायला तयार होत नव्हता, पोलिसांनी त्याची समजूत काढत अटक करणार नाही असे आश्वासन देखील दिले. मात्र तो काही केल्या खाली येत नसल्याचे बघून पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला एका खोलीच्या खिडकीतून येण्यास सांगितले, तसेच तो उडी मारेल म्हणून त्याला झेलण्यासाठी संरक्षण जाळी लावण्यात आली. मात्र तीन तास उलटूनही तो खाली येण्यास तयार होत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाचा एक जवान सुरक्षा बेल्ट बांधून खिडकीतून कठड्यावर उतरण्याचा प्रयत्न करीत असताना या तरुणाने शेजारच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आवारात ‘ ‘वंदे मातरम’ म्हणत उडी टाकली. त्यात तो गंभीर जखमी झाला, पोलिसांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमी असताना त्याने त्याचे नाव रोहित एवढेच पोलिसांना सांगितले. त्याचे पूर्ण नाव काय, तो कुठे राहतो इमारतीत कशासाठी आला होता याबाबत तो काहीही सांगू न शकल्याने त्याची अधिक माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.

वंदे मातरम म्हणत मारली उडी

या तरुणाने वंदे मातरम ची घोषणा देत शेजारच्या विश्व महल इमारतीच्या आवारात उडी टाकली त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याने अशी घोषणा देत उडी टाकण्याचे कारण काय आहे याबाबत काहीही कळू शकलेले नाही. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मृत तरुणाविरुद्ध विनापरवाना इमारतीत प्रवेश, करणे, स्वतःच्या जीवितास धोका पोहचेल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.