माझी जन्मठेप मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक

वाईट प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपल्या मनाची तयारी कशी करायची, यासाठी सावरकरांनी सांगितलेला हा उपदेश खूप मोलाचा आहे.

199

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३८वी जयंती… २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर या गावी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ एक नाव नाही तर अखंड हिंदुवादी, प्रखर राष्ट्रभक्तीचं तत्त्व आणि सत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कराल कारावास भोगला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची महती सांगण्यासाठी त्यांनीच लिहिलेले अनादि मी, अनंत मी, अवध्य मी हे शब्द अत्यंत समर्पक आहेत. अंदमानच्या कराल कारागृहात मरणप्राय यातना भोगत असतानासुद्धा प्रचंड इच्छाशक्ती, ही त्या काळातील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती. त्याचप्रमाणे त्यांचे विचार आज या सगळ्या कठीण काळात देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याला नवी उमेद देण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या माझी जन्मठेप या पुस्तकातील एक उतारा सुद्धा आपल्याला भविष्यातील असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानातील शिक्षेतून मुक्तता होऊन १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन…

सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे, आव्हानाचा आहे. गेल्या वर्षभरापासून एका व्हायरसमुळे आयुष्याची सगळी गणितंचं बदलून गेली आहेत. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे, काहींना पोटापाण्याची चिंता सतावत आहे. एकंदरीतच आपण सगळे भविष्यात नेमकं काय होणार, याच गोष्टीचा विचार करत आहोत. आज स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला घरात बसावं लागतंय. आपल्याकडे आज सगळ्या सुखसुविधा आहेत, पण तरीही आपल्याला या घरात बसण्याचा कंटाळा येतो. अगदी छोट्या कारणांवरुन आपल्याला नैराश्य येतं, त्यातून नको ते विचार आपल्या मनात घोंगावतात. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी सोसलेल्या हालअपेष्टा आठवल्या, तर त्यासमोर आपलं हे नैराश्य किती शुल्लक आहे त्याचा आपल्याला अनुभव येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या कराल कारागृहात आपल्या ऐन उमेदीतली ११ वर्ष काढली, ती सुद्धा आपल्या मातृभूला स्वतंत्र करण्यासाठी. जिथे कागदाचा एक तुकडा सुद्धा मिळणं मुश्कील होतं, त्याठिकाणी सावरकरांनी भिंतीवर खिळ्यांनी ‘कमला’ हे महाकाव्य रचलं. त्यांच्या या असामान्य कर्तृत्त्वामागे होता तो स्वातंत्र्यप्राप्तीचा कठोर वज्रनिश्चय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’मध्ये लिहिलेला एक उतारा या वज्रनिश्चयामागचा स्त्रोत आहे, असंच म्हणावं लागेल. आपल्या आयुष्यातील संकटांवर, आव्हानांचा सामना करताना आपला निश्चय ढळू न देता मात कशी करायची, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले हे मार्गदर्शन, आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.

प्रतिकूल तेच बहुधा घडेल

आपल्या या हेतुपुरस्सर स्वतःवर ओढवून घेतलेल्या संकटात जर कोणता नियम आपल्यासाठी हितपरिणामी झाला असेल, तर तो प्रतिकूल तेच बहुधा घडेल हे गृहीत धरुन त्याला तोंड देण्यासाठी मनाची तयारी करणं हा आहे, असं स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास घेतलेल्या सावरकरांनी माझी जन्मठेप मध्ये म्हटलं आहे.

ज्यांचा ज्यांचा सर्वतोपरी असहाय अशा कालांत, देशांत किंवा परिस्थितीत जन्म झाला असेल आणि तरीही त्या परिस्थितीशी झुंज देऊन तिला चीत करुन, तिच्या छातीवर उभे राहून कोण्या नवयुगाची, कोण्या महान ध्येय्याची, उषा(पहाट) ज्यांना पहावयाची असेल, त्यांनी प्रतिकूल तेच बहुधा घडेल हे गृहीत धरुन त्यास तोंड देऊ या नियमाचे हलाहल प्यायलेच पाहिजे.

आपल्या जीवनात प्रतिकूल(वाईट) तेच घडणार आणि आपण त्याला तोंड देणार, असा निर्धार आपण केला आणि समजा काही अनुकूल(चांगले) घडले तर काही नुकसान न होता, त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण कायम अनुकूल तेच घडणार अशी आशा, लालसा करत बसलो आणि समजा काही प्रतिकूल घडले, तर एकाएकी निराशेच्या कोसळणा-या पहाडाखाली धैर्याचा चक्काचूर झाल्याविना राहणार नाही, असे सावरकरांनी सांगितले आहे. त्यामुळे वाईट प्रसंगांना तोंड देण्यासाठी आपल्या मनाची तयारी कशी करायची, यासाठी सावरकरांनी सांगितलेला हा उपदेश खूप मोलाचा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.