सावरकर, आंबेडकर आणि अस्पृश्यता

183

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर 20 व्या शतकातील, भारतीय उपखंडात दैदिप्यमान कामगिरी ठरणारी दोन व्यक्तिमत्वं आहेत. या दोन्हीही महापुरुषांचा जन्म 19 व्या शतकाच्या शेवटच्या काळात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर उच्चवर्णीय कोकणस्थ ब्राह्मण तर बाबासाहेब आंबेडकर शुद्र जातीतले. दोघांचेही मूळ कोकणातच. दोघांनीही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा महाराष्ट्र, देशातच नव्हे तर संपूर्ण जगात रोवला. दोघेही प्रचंड प्रज्ञावान. दोघांचेही व्यक्तिमत्व प्रचंड आकर्षक! समोरच्यांवर छाप पाडणारे! दोघांचेही वक्तृत्व अभ्यासपूर्ण व श्रोत्यांच्या मनावर आरुढ होऊन, आपल्या ओघवत्या वाणीने, धबधब्यासारखे ओसंडणारे आणि आपल्या वैचारिक तर्कवादाने श्रोत्यांना चिंब अनूभूती देणारे असे.

बाबासाहेब अर्थात भीमराव रामजी आंबेडकर हे शूद्र समजल्या जाणाऱ्या महार जातीत जन्माला आले. प्रत्यक्ष गाव कुसाबाहेरचं जगणं आणि समाज बहिष्कृतरुपी वणव्यात होरपडणं काय असतं हे स्वतःच लहानपणापासून तो ‘जगातलं सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या उच्च विद्याभूषित झालेल्या तरुणापर्यंत’ स्वतः अनुभवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र असं लहानपण अनुभवलं नाही. पण त्यांना परकायाप्रवेश संकल्पनेनुसार दुरितांचे दु:ख समजण्याची विलक्षण क्षमता बालपणापासूनच होती. दोघेही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलेले बॅरिस्टर पदवी मिळवलेले, आग्लंविद्याविभूषित व्यक्ती होते.

अस्पृश्यता निवारण कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे असे दोघांनाही उमजले होते. माझ्यापेक्षा माझा समाज कुत्र्या मांजरांपेक्षाही हीन दीन स्थितीत जगतोय, हे समाज ऋण फेडण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष करणारे बाबासाहेब होते. ह्या संघर्षासाठी आयुष्य वेचणारे भीमराव साधेसुधे नव्हते तर देशातील तत्कालीन नेत्यांमध्ये सर्वात विद्वान, प्रज्ञा पंडित होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी विविध आयुधांचा वापर केला. मग ते सर्वसामान्यांना जागृत करणे असो, त्यांच्यासोबत आंदोलन करणे असो, समाज जागृती करिता संशोधन पर ग्रंथ तयार करणे असो, वा कायद्याच्या भाषेत न्याय मिळवून देणे असो, सर्व मार्ग बाबासाहेबांनी अवलंबिले.

सावरकरांचं अस्पृश्यता विरोधी आंदोलन, हे मानवीय तत्त्वावर होतं तसेच राष्ट्रासाठी सुद्धा होतं. राष्ट्र बलाढ्य करायचं असेल तर हिंदूंना बलाढ्य केले पाहिजे! त्याकरिता हिंदूतील सर्व जातींना एकत्र केले पाहिजे. जाती जातीत विभागलेला हिंदू , या सर्वांना एकत्र करून सामर्थ्यवान, बलाढ्य हिंदूंचं हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी सावरकरांचं अस्पृश्यता आंदोलन होतं. पशुंना देवांची जननी मानणारे हे हिंदू आपल्याच हाडामासासम असणाऱ्या पुरुषाला असं हे हीनदिन जगणं कसं देऊ शकतात? यावर ते प्रखरतेने विचार मांडून हिंदूंना जागृत करीत. सावरकर फक्त विचारवंत व विचार मांडणारेच नव्हते तर तो विचार प्रत्यक्ष अंमलात आणणारे व तशी कार्यवाही करणारे कार्यवीरही होते.

सावरकरांचा ह्या अस्पृश्यता आंदोलनाचा श्रीगणेशा भगूर- नाशिकचा बालमेळा पासून ते पुणे, लंडन व अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सुद्धा दिसून येतो. त्याचं प्रकटीकरण रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत मात्र प्रकर्षाने दिसून आलं. शत्रूशी लढताना आपण ज्या स्थितीत असू त्या स्थितीत जे जे करता येईल ते ते त्या व्यक्तीने केलं पाहिजे. रत्नागिरीतील स्थानबद्धतेत प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नाही, हे जाणून नाटकाच्या रूपाने देशाला जागृत करणे, सर्व अस्पृश्यांना धर्माचे सर्व अधिकार देणे. त्यांच्यातील न्यूनगंड नाहीसा करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे. त्यांच्या हस्ते मंदिरातील देवांची पूजा करणे, त्यांच्यासोबत जेवायला बसणे, हिंदू हॉटेलात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे. अशा प्रकारची हिंदू हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे. अशी विविध प्रकारची कामे अस्पृश्यता संपवण्यासाठी स्वतः सावरकरांनी रत्नागिरीत राहून केली. रत्नागिरीतील भागोजी कीर यांच्या सहाय्याने बांधलेले पतीत पावन मंदिर हे त्यांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तिथे पूजा प्रत्यक्ष भंगी बांधवांकडून करून घेतली. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू…’यासारखी जाती निर्मूलन करणारी गीत लिहून सादर करवली. संगीत उ:षाप नाटकातून अस्पृश्यता विषय समाजासमोर मांडला. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अस्पृश्य सेवेविषयी लिहितात,’वीर सावरकरांची अस्पृश्य सेवा गौतम बुद्धाइतकीच मोठी व परिणामकारक आहे.’

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंसा व अहिंसा या विषयाला वाहिलेलं व संपूर्ण अहिंसेच तत्त्वज्ञान विशद करणारं ‘सन्यस्त खडग्’ सारखं नाटक जरी लिहिलं असलं, तरी त्यांच्या मनात तथागत गौतम बुद्धांविषयी मनापासून आदर होता; हे त्यांच्या पुढील कथनावरून स्पष्ट होते. ‘स्वयम बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्तांच्या मनात बौद्ध संघाविषयी जो आदर आणि जे प्रेम असेल, तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणारा बौद्ध धर्माचा मी एक नम्र चाहता आहे. बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतली नाही त्याचे कारण हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे, तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय. ‘एके ठिकाणी सावरकर म्हणतात,’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खरे महापुरुष होते.

‘खरे म्हणजे संपूर्ण देशाने 14 एप्रिल ते 28 मे हा कालखंड सर्व जातींना समरस करणारे, परस्परांत प्रेमभाव निर्माण करणारे, बलाढ्य भारत राष्ट्राला सामर्थ्यवान व एकसंध बांधण्यासाठी , सर्व जाती निर्मूलन करण्यासाठी राष्ट्र स्तरावरून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जातींचे महत्त्व कमी करण्यासाठी संशोधन करून उपक्रम राबविले पाहिजे. हीच खरी या पर्वकाळात, या महामानवांना खरी आदरांजली ठरेल!

हेमंत चोपडे

(लेखक सावरकर व आंबेडकर यांचे अभ्यासक असून, ‘सावरकर आंबेडकर एक समांतर प्रवास’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.