वीर सावरकरांच्या कवितेतील ‘मी’…

293
वीर सावरकरांच्या कवितेतील ‘मी’...
वीर सावरकरांच्या कवितेतील ‘मी’...

-जयेश शत्रुघ्न मेस्त्री

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन ज्याप्रमाणे संघर्षमय आहे, नाट्यमय आहे त्याचप्रमाणे ते काव्यमय देखील आहे. लहानपणापासून ते कविता रचत आले आहेत. एखाद्या व्यक्तीचे जसे निरनिराळे अवयव असतात, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तिमत्वाचे विविध गुण असतात आणि ते एकेक गुण म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचे जणू अवयव असतात. वीर सावरकर हे बहुगुणी होते. काव्य-प्रतिभा हा त्यातला एक गुण. वीर सावरकरांइतके बहुगुणी व्यक्तिमत्व अनेक महापुरुषांना लाभले आहे. मात्र काव्य-प्रतिभा हा अतिरिक्त गुण वीर सावरकरांकडे असल्यामुळे त्यांना त्यांच्यातला ‘मी’ कवितेतून मांडता आला.

वीर सावरकरांच्या कविता भावोत्कट होत्या, पण शोक व्यक्त करणे हा वीर सावरकरांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या कविता ध्येयवादी होत्या, लढवय्या होत्या. वीर सावरकरांनी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली असल्यामुळे त्यांच्या कवितांना धार होती. वीर सावरकर हे स्वतः नायक होते म्हणूनच की काय त्यांनी कवितेतून स्वतःचा उल्लेख बऱ्याचदा केला आहे. ‘अनादी मी. अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला.’ बऱ्याचदा कवींना किंवा लेखकांना एक काल्पनिक नायक घडवावा लागतो किंवा एखाद्याला आदर्श ठरवून मिळता जुळता नायक तयार करावा लागतो. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण जीवन नायकासारखे होते आणि आपण कोण आहोत याची जाणीव वीर सावरकरांना होती. अहंकार नसला तरी जाणीव होती हे मात्र खरे.

आत्मबल या कवितेतला जो ‘मी’ आहे, तो ‘मी’ वीर सावरकरांनी स्वतःला उद्देशून लिहिला असला तरी त्या ‘मी’ मध्ये आपल्याला दर्शन घडते भगवान श्रीकृष्णांचे, प्रभू श्रीरामचंद्रांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, बाजीराव पेशव्यांचे… इतकेच काय तर आपण त्या ‘मी’ मध्ये स्वतःला देखील पाहतो. समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्लोक’ लिहिले. मात्र मनाचे श्लोक जाणून घेतल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की खरोखर समर्थ रामदासांसारख्या ‘मी’ चा शोध घेतलेल्या दिव्य पुरुषाला मनाचे श्लोक स्वतःसाठी लिहिण्याची गरज होती का? तर नाही. मनाचे श्लोक मधला मी किंवा ज्या मनाला उपदेश केला आहे ते मन समर्थांचे नसून ते मन आपले आहे. समर्थांनी सर्वसामान्य माणसासाठी मनाचे श्लोक लिहिले. त्याचप्रमाणे वीर सावरकरांच्या आत्मबल कवितेतल्या ‘मी’ मध्ये आपण स्वतःलाही पाहतो. निराश झालात की ही कविता वीर सावरकरांच्या फ्लोमध्ये (भावनेच्या प्रवाहात) म्हणून पाहा. एक वेगळेच बळ संचारते.
‘गुण सुमने मी वेचियली ह्या भावे,
की तिने सुगंधा घ्यावे.
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा,
हा व्यर्थ भार विद्येचा’
हे जणू स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र आहे, त्याचबरोबर हा तरुणांना दिलेला संदेश देखील आहे. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपण शिक्षण घेतले, विदेशात गेलो. त्याचप्रमाणे इतर तरुणांनी देखील असा त्याग करावा अशी वीर सावरकरांची इच्छा होती. ‘लेखणी मोडून बंदुका हातात घ्या’ हे सांगणे त्याचसाठी होते. त्या काळी मातृभूमीला क्रांतिकारकांची आणि हौतात्म्याची आवश्यकता होती. म्हणून वीर सावरकरांनी इतरांना उपदेश केलाच, परंतु स्वतः देखील समिधा होऊन या क्रांतियज्ञात त्यांनी उडी घेतली.
‘ऋण तो फेडाया, हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा.’ किंवा प्रभाकरांस या कवितेतील एका पित्याचे दुःख, सागरांस या कवितेमध्ये मातृभूमीपासून दूर होण्याचे दुःख समजून घेतले पाहिजे. या कविता त्यांनी स्वतःच्या जीवनावर, त्या त्या प्रसंगांवर लिहिल्या आहेत.
या कवितांमधून ‘मी’ दिसून येतो. हा मी आत्मप्रौढी सांगत नाही. तर यातून आपल्याला दिसतो तो एक देशभक्त, व्याकूळ पिता, लढवय्या आणि मातृभूमीचा लाडका लढवय्या सैनिक… वीर सावरकरांच्या कवितेतला ‘मी’ समजून घेण्यासाठी किमान १०० पानांचे पुस्तक लिहावे लागेल. तुर्तास इथे थांबतो… जाता जाता त्यांच्या कवितेतल्या दोन ओळी आठवल्या…
‘हलाहलाSS त्रिनेत्र तो, मी तुम्हांसि तैसाचि गिळुनि जिरवितो.’
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.