– डॉ. नीरज देव
आता बहुतेकांना बहुतेक गोष्टी झटपट इन्स्टंट हव्या असतात. त्यांच्यासाठी हा घ्या सावरकरांच्या समग्र जीवनाचा झटपट आलेख…
मला दिसू लागले ते पोरसवदा चवदा वर्षीय सावरकर! चापेकरांच्या बलिदानाने विव्हळ झालेले विनायकाचे ते बालमन। चापेकरांनंतर त्याचे अपूरे कार्य कोण पूर्ण करणार? म्हणून कासावीस झालेला त्याचा जीव। इतर कोणी का? मीच का नाही! म्हणून ठरलेला तो वज्रनिश्चय! ती रूधिरप्रिया अष्टभूजा अन् ती रूधिराभिषेक करणारी अन् करविणारी प्रतिज्ञा; शत्रूस मारता मारता मरेतो झुंजण्याची। चापेकरांच्या संत्रस्त आत्म्याला –
कार्य सोडुनि अपूरे पडला
झुंजत खंती नको पुढे
कार्या चालवू तुमच्या अम्ही
पराक्रमाचे गिरवित धडे
चे आश्वासन देणारा बाल विनायक। तो चापेकराचा फटका। पन्नास वर्षे छापता न आलेला तरीही सव्वाशे वर्षे जगलेला पोवाडा। मग प्लेगचा हा हा कार। प्लेगची वडिलांना; अण्णांना झालेली लागण। अण्णांचा मृत्यू। माते पाठोपाठ पित्याचा जाण्याने सोळाव्या वर्षी आलेल ते पोरकेपण। अनाथपण। अन् त्यावरही मात करून उरलेले देशप्रेम।
ते नासिक। ती तिळभांडेश्वर गल्ली। तो मित्रमेळा। तो अभिनव भारत। ‘तो तोफे आधी मरे न बाजी’ सांगणारा; ‘चला घालु स्वातंत्र्यसंगरी रिपुवरी घाला’ची हाक देणारा बाजी प्रभुचा पोवाडा। तो शत्रूरूधिराने तहान भागवायला सांगणारा सिंहगडाचा पोवाडा। ते बाबा सावरकर। ते बाळ सावरकर। ते वि म भट। अन् आजाराच्या बेहोषीतही इंग्रजांशी लढता लढता धारातिर्थी पडलेले विनायकाचे सहकारी ते म्हसकर। ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ची रणगर्जना करणारा तो पांगळा तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीचा गोविंद। तो गणेशोत्सव। ती शिवजयंती। ते मेळे अन् ते मेळावे नाशिकच्या तपोभूमिला क्रांतीभूमी बनविणारे।
मुक्काम पुणे। ते युवा सावरकर। ते ‘तुजविण जनन ते मरण’ची आर्त साद घालणारे स्वतंत्रतेचे स्त्रोत्र। ती शिवरायाची आरती| ती विदेशी कापड्यांची भली मोठी होळी। ते लोकमान्य टिळक अन् काळकर्ते परांजपे। अन् त्यांच्या देखत होळीची धग फिकी वाटायला लावणारे युवा विनायकाचे ते ज्वलजहाल वक्तव्य। ती वसतिगृहातून हकालपट्टी। तो देशभक्तीसाठीचा दंड। अन् ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ची केसरीची सिंह गर्जना।
ती मुंबई। तो मुंबईचा किनारा। तो लहानगा प्रभाकर। त्याचा तो घेता घेता घ्यायचा कायमचा राहून गेलेला मुका। ती नौका। ते हरनामसिंह। ते शिष्टाचारी। ते शीख सहकारी। अन् बोटीवरच विनायकाने त्यांना दिलेली क्रांतीकार्याची दीक्षा। मातृभूमीच्या दास्यविमोचनाची दीक्षा। ती तारकास पाहून स्फुरलेली कविता। तीमधील त्या अदभुत रम्य कल्पना अन् तत्वज्ञानाची उंचच उंच झेप।
(हेही वाचा – वीर सावरकर: शिवरायांचा निष्ठावंत मावळा)
ते लंडन। सातासमुदावर राज्य करणा-या इंग्रजांची राजधानी। लंडनचे ते वैभव, लंडनची ती सुबत्ता, लंडनचे ते सामर्थ्य। अन् त्याने दीपून गेलेले, दबून गेलेले तेथील हिंदी तरूण, हिंदी राजकारण। ते इंडीया हाऊस। ती विनायकाची फ्री इंडीया सोसायटी। ते शामजी कृष्णवर्मा। ते बॅरिस्टर राणा। त्या मादाम कामा। ते हरदयाळ, अय्यर, बापट, ग्यानचंद वर्मा, भाई परमानंद अन् मदनलाल ढिंग्रा। आणि या सा-यांना कांतिची दीक्षा देणारा तो तेवीस वर्षीय विनायक। समाजवादी परिषदेत, लेनिनच्या उपस्थितीत तो स्टुटगार्डला फडकलेला स्वतंत्र हिंदुस्थानचा झेंडा। विनायकाच्या भावविश्वातील तिरंगा।
विनायकाचे तो माझिनी। माझिनीची ती ‘नाही नाही राष्ट्रे कधीही मरत नसतात’ हे त्रिकालाबाधित सत्य गर्जून सांगणारी २६ पानी उर्जस्वल, प्रस्फूर्त प्रस्तावना। इंग्रजी साम्राज्याची झोप उडविणारे ते १८५७ चे स्वातंत्र्यसमर। १८५७ चा प्रयोगसिद्ध नि प्रस्फोटक इतिहास। प्रसिद्धीपूर्वीच दोन राष्ट्रांनी जप्त केलेले ते ग्रंथरूपी रसायन। तरीही इंग्रजांच्या नाकावर टिच्चून झालेले त्याचे प्रकाशन। ती बॉम्बची विद्या। ते बॉम्बहूनही भयानक पत्रक। भावाच्या जन्मठेपेने खचून न जाता ‘धन्य धन्य अपुला वंश’ची गर्जना करणारे ते सांत्वन मधून स्रवणारे धैर्य। अन् सर्वस्व मातृभूमीच्या नावे केल्याची घोषणा करणारे ते दिव्य मृत्युपत्र।
आणि… आणि तो कर्झन वायलीचा कपाळमोक्ष। ती धिंग्राच्या निषेधाची उधळलेली सभा। ते सभा उधळण्याचे कारण देणारे मुत्सदी निवेदन। अन् देशोदेशीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेले ते हुतात्मा मदनलालचे पोलिसांनी दाबून ठेवलेले निवेदन। तो ब्रायटनचा समुद किनारा। ती सागराला घातलेली ‘ने मजसी ने’ची आर्त साद। तो अगस्तीचा धाक। ते पॅरिस। अटकेची शक्यता असतानाही लपून न बसता; लंडनला मारलेली धडक। लंडनचे ते कारागृह। ती कराल काला छिन्नमुंडा दूजी मूर्ति। चार वर्षापूवी लंडनला पोहोचलेला सामान्य विद्यार्थि विनायक अन् आता बेड्यात जखडून भारतात आणला जाणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रांतीचा तत्वदर्शी नेता वीर सावरकर!
तो मार्सेलसचा किनारा। ती मोरिया बोट। बोटीचे ते पोर्टहोल। अन् यमालाही धडकी भरवणारे ते अदभुत साहस। तो फ्रान्सचा किनारा। ते क्षणाचे क्षणात हरवलेले स्वातंत्र्य। क्षणाच्या स्वातंत्र्यात उभा करून ठेवलेला आंतरराष्ट्रीय तिढा।
पुनः अटक| पुन्हा बंदीवास| पुनः छळ। ते दीर्घ उसासे। ती उदासिनता। अन् त्यावर मात करत ‘अनादी मी अनंत मी‘चा जयघोष करणारे ते अदम्य आत्मबल।
आणि… आणि विनायकाच्या या साहसात चव्हाट्यावर आलेली आपली इज्जत वाचवायला हेग मध्ये धडपडणारे ते फ्रान्स अन् ते इंग्लड।
मग तो खटल्याचा फार्स। ती दोन जन्माची जन्मठेप। दोन जन्माचे देशकार्य एकाच जन्मात करणा-या देशभक्ताचा शत्रूने केलेला गौरव। ते डोंगरीचे कारागार। पतीपत्नीची ती विदीर्ण तरीही विलक्षण भेट। भग्नतेतही पाहीलेले ते भव्य विश्व संसाराचे स्वप्न।
ते अंदमान, ते कदान्न, त्या जळवा, ते जावरे, तो कोलू, ती दंडाबेडी, ती हातबेडी, ती काथ्याकूट अन् ती गळ्यापासून हातापायाला जखडणारी बेडी अन् तिच्यावर डी – डेजरस या अक्षराने कोरलेली ती सन्मानपट्टीका। भारतरत्नची पट्टी मिरविणारे खो-याने मिळतील पण अशी पट्टी मिळविणारा विनायक विरळाच।
यावर मात करीत केलेली ती कैद्यांची साक्षरता चळवळ। ते शुदधी आंदोलन। ग्रंथालय आणि… आणि ती अंदमानच्या काळकोठडीत काट्याखिळ्यांनी कोरलेली काव्यलेणी। कमला, गोमांतक, महासागर, विरहोच्छ्वास, सप्तर्षि, दहा हजार पंक्तिंची कविता। काळकोठडीत जन्मूनही कालातीत असलेली। छळाने कला जोपासणारा तो अदभुत काव्ययोग।
रत्नागिरी पर्वाचा आरंभ। जनहीताचे ध्येय। जातींचे समूळ उच्छेदन। ती सहभोजने। ते सार्वजनिक सत्यनारायण, गणेशोत्सव। ते पतितपावन मंदिर। तो ‘सूतक युगांचे सुटले रे’ गात गात विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलेला शिवू भंगी। पूर्वास्पृश्यांचा विठ्ठल मंदिर प्रवेश। तो जाळलेला जन्मजात अस्पृश्यतेचा पुतळा| आंबेडकरी जनतेला दिसलेले बुद्धरूपातील सावरकर। वि रा शिंदेंचे ते सावरकरांवर जीव ओवाळून टाकणे। समाज क्रांतीकारक सावरकर|
ते अंधश्रदेविरुद्धचे युद्ध। गाय माता नव्हे उपयुक्त पशूचा प्रहार| यंत्र तंत्राचा, आधुनिकतेचा पुरस्कर्त विज्ञाननिष्ठ सावरकर|
ते नेपाळी आंदोलन| त्या लिपी अन् भाषा सुधारणा| संसद, महापौर, चित्रपट, दूरदर्शन, दूरध्वनी अनेक शब्दांचा निर्माता विनायक|
विनायकाच्या भेटीला आलेले गांधी, भगतसिंह, अय्यर, सांन्याल, हेडगेवार, माधव ज्युलियन, डॉ. केतकर, युसूफ मेहेर अली आदि अनेक…
तो श्रद्धानंद। ते जात्युच्छेदक निबंध। ते विज्ञाननिष्ठ निबंध। त्या अंधश्रद्धा निर्मूलक कथा। ती उदबोधक नाटके उःशाप, उत्तरकिया, सन्यस्य खड्ग। ते आत्मचरित्र माझी जन्मठेप। ते हिंदुत्व। ती हिंदुपदपादशाही। ते रणशिंग। डोळे उघडायला लावणारी ती कादंबरी मोपल्याचे बंड।
रत्नागिरीतून सुटका। ती मुंबई। तो सर्वपक्षीय सत्कार। ते मानवेंद्र नाथ रॉय, लेनिनचे सहकारी, मॅक्सीकोतील क्रांतीचे महान नेते। खास धोतर जोड्यात? मना, जपून ठेव तो अत्यदभुत क्षण। युगायुगातून उगवणारा; शाश्वत टिकणारा चिरकाल आठवला जाणारा क्षण। मानवेंद्र नाथांनी विनायकाच्या पद कमलाना स्पर्श केला। एका जागतिक किर्तीच्या कम्युनिस्ट धुरांधराने दुसऱ्या जागतिक कीर्तीच्या युगपुरुषाला। एका उत्तुंग कर्तृत्वाने दुसऱ्या उत्तुंग कर्तृत्वाला। स्वतः पेक्षा वयाने केवळ चार; होय केवळ चार वर्षे मोठ्या असलेल्या महापुरुषाला दिलेली सार्वजनिक मानवंदनाच होती ती। ‘धन्य! धन्य!!’ काळ स्वतः शीच पुटपुटला। जे टीचभर कर्तृत्वाच्या पण ढीगभर डांगोरा पिटणाऱ्या हीन मनोवृत्तीला जमत नसते ते उत्तुंग कर्तृत्वाच्या भव्य मनोवृत्तीला सहज जमून जाते। धन्य मानवेंद्रा! धन्य विनायका!!
२७ वर्षे इंग्रजांच्या कैदेत अन् नजरकैदेत घालविल्यावर वयाच्या ५४ व्या वर्षी राजकारणात घेतलेली ती उडी। ती काँग्रेसच्या मंडपात एका कोप-यात चालणारी हिंदुमहासभा। विनायक स्पर्शाने तिची झालेली राष्ट्रीय महासभा। तिची ती महाअधिवेशने। कर्णावती, नागपूर, कोलकाता, मदुरा, भागलपूर अन् कानपूर। तो भागलपूरचा सविनय कायदेभंग नि तो भागलपूरचा विजय। तो भागानगरचा निःशस्त्र लढा नि तो भागानगरचा विजय। ते राजनीतीचे हिंदूकरण नि हिंदूंचे सैनिकीकरण। ते रासबिहारीचे अनावृत पत्र। ती रासबिहारीची सार्वजनिक मानवंदना। ते सुभाषचे भेटणे। ते सुभाषचे रूपांतरण। सत्याग्रही ते सशस्त्र क्रांतिकारी सुभाष। तो सैनिकांचा उठाव। अखंड भारताचा एकहाती लढा। विनायकाच्या कर्तृत्वाचा अपूर्व अध्याय।
आणि… आणि… ती क्षयाची भावना। ती राजनितीतून निवृत्ती। तो भारतराष्ट्राच्या वैभवाचा क्षण। पण अखंडत्वाचा ह्रास। ती विभाजनाची व्यथा। तो तीन तृतीयांश ध्येयपूतीचा आनंद।
मग… मग ती गांधी हत्या। तो अश्लाघ्य आरोप। तो स्वजनांनी टाकलेला कूटील डाव, नीचतेचा कळस, करंटे पणाची पराकाष्ठा। ती स्वजनांनी केलेली प्रताडना। तो स्वतंत्र भारतातील इंग्रजी मनोवृत्तीच्या शासकाशी लढा। अन् पुन्हा विजय। ती निःष्कलंक सुटका। कृतघ्न भारत अन् कृतार्थ विनायक।।
अभिनव भारताची सांगता। ती सहा सोनेरी पाने। लोकमान्यांची शताब्दी। ती १८५७ची शताब्दी। दिल्लीतील ती प्रचंड सभा। तो मृत्युंजय दिन। ते पत्नीचे जाणे। तो श्राद्धादि कर्मकांडाला नकार। तो आत्महत्या आत्मार्पण लेख। ती विद्युत दाहिनीत जळण्याची अंतिम इच्छा। मरणाच्या शेवटच्या घडी पर्यंत टिकलेली अढळ विज्ञाननिष्ठा। ते मृत्यूला आवाहन। ते प्रायोपवेशन। तो भीष्मनिग्रह। अन् ते मृत्यूला थिजवून निघून जाणे। एका हुतात्म्याचे महात्मा बनणे। ते कृतार्थ जीवन। हे कृतकृत्य मरण। उत्कट, भव्य जीवनाला भव्योदात्त मरणाचा चढलेला साज। मराठी रसिकांनो! हा घ्या विनायकाच्या शतपैलू जीवनाचा झटपट आलेख।
(लेखक मनोचिकित्सक असून ‘दशग्रंथी सावरकर’ने सन्मानित आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community