वीर सावरकरांचे जीवनकार्य, तत्वज्ञान आणि साहित्याचा प्रसार करणे या उद्देशाने वडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्र काम करत आहे. या केंद्राच्या स्थापनेपासून ही संस्था आपल्या उद्देशपूर्तीसाठी सतत कार्यरत असून, याचा आम्हाला गर्व आहे, अशी भावना या संस्थेचे सदस्य अनिल कानिटकर यांनी व्यक्त केल्या. 2022 सालचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार वडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्राला प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांचा दरवर्षी गौरव करते. 2022 सालचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार वडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्राला प्रदान करण्यात आला.
…म्हणून या स्मृतीकेंद्राची स्थापना
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जेव्हा 1966 ला निधन झाले, तेव्हा वडोदराच्या विद्यार्थ्यांनी वीर सावरकरांच्या अंत्यदर्शनाला जाण्याचे ठरवले. वीर सावकरांच्या अंत्यदर्शनासाठी आम्ही वडोदराहून मुंबईला आलो. दुपारी जेव्हा अंत्ययात्रा निघाली तेव्हा आम्ही दादरहून चंदनवाडीपर्यंत चालत गेलो आणि तेव्हाच आम्ही प्रतिज्ञा केली की, वीर सावरकरांचे वडोद-यामध्येही एक केंद्र असावे. वीर सावरकरांबद्दल लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, तसेच ज्यांना वीर सावरकरांबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत सावरकर पोहचावेत हा आमचा मुख्य उद्देश आहे.
( हेही वाचा: दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार! )
स्मृतीकेंद्राला अवश्य भेट द्या
कानिटकर म्हणाले की, तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करतो की, तुम्ही कधीही वडोद-याला याल तेव्हा स्मृती केंद्राला नक्की भेट द्या. संस्थेने बनवलेले क्रांतीतीर्थ आहे. तिथे आम्ही वीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावरकरांच्या सहका-यांची अर्धप्रतिमा स्थापन केली आहे. मला विश्वास आहे की आमचा वडोदरामध्ये जो उपक्रम आहे तो पाहून तुम्ही आम्हाला या कार्यात अधिक प्रोत्साहन द्याल, असे सांगत कानिटकर यांनी स्मारकाचे आभार मानले.
Join Our WhatsApp Community