Swatantrya Veer Savarkar Film : ‘इतिहासाचा सखोल अभ्यास’ आणि योग्य मांडणी हेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं यश

रणदीप हुड्डा यांचा ‘अती अभ्यास’ कोणा एकासाठी त्रासदायक ठरला म्हणे, पण त्या अती अभ्यासामुळेच एक चांगला चित्रपट निर्माण झाला हे निश्चित.

481

– मंजिरी मराठे

रणदीप हुड्डा यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती या सर्वच भूमिका ज्यांनी यशस्वीपणे पेलल्या त्या रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट ज्यांना विलक्षण भावला त्या प्रत्येकालाच पुरस्काराच्या बातमीनं आनंद झाला असणार.

सावरकर कोण हे माहीत नसताना, त्यांच्याबद्दल वाचलेलं नसताना, थोडंफार वाचल्यावर ते ‘व्हिलन’ आहेत अशी झालेली भावना ते प्रचंड अभ्यास झाल्यावर सावरकर नावाच्या माणसावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा झालेला दृढनिश्चय आणि त्यातून जन्माला आलेली अप्रतिम कलाकृती ही रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची विशेषता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटात केवळ सावरकर असणार नाहीत तर त्यांचे समकालीनही असणार हे ज्यांना कळलं आहे, असे चित्रपटाचे लेखक रणदीप हुड्डा. चित्रपटात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणणारे लोकमान्य टिळक असणार, भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकही असणारच कारण सावरकरांच्या आयुष्यात या सर्वांना अनन्यसाधारण महत्व होतं, हे ज्यांना कळलं आहे ते रणदीप हुड्डा. त्यांनी ‘जरा जास्तच अभ्यास केला’, पण तो सत्कारणी लागला, हे सावरकर चित्रपट बघितल्यावर, त्यांच्या मुलाखती ऐकल्यावर आपल्याला मान्यच करावं लागेल.

(हेही वाचा Veer Savarkar : क्रांतिवीर भगतसिंग यांनी खरंच वीर सावरकर यांची भेट घेतली होती का?)

आपल्या क्रांतिकार्याचं स्फुर्तीपद सावरकरांनी काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांना दिलं पण गुरूंचे गुरु मानलं ‘केसरी’ला, लोकमान्यांना. सावरकर म्हणतात, ‘लोकमान्य टिळक खड्गाची मूठ होते, आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ जरी पाते होऊ शकत नाही तरी पाते हे मुठीच्याच आधारावर रणकंदनी लवलवते. पाते मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते’.

२२ जुलै १९०५ ला वंगभंगाची अधिकृत घोषणा झाल्यावर लोकमान्यांनी ‘आता आणीबाणीची वेळ आहे’ म्हणत जनसमुदायाला ललकारलं आणि स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सुत्रीची घोषणा केली. सावरकरांनी पुण्यात दसऱ्याला, ७ ऑक्टोबर १९०५ ला विदेशी कपडयांची पहिली होळी पेटवली. त्याला टिळक, परांजपे यांचे आशीर्वाद लाभले.

१८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीत ब्रिटिश अधिकारी रँडनं केलेल्या अत्याचारांचा प्रतिशोध म्हणून चापेकर बंधूंनी रँडचा वध केला. त्यांनाही लोकमान्यांचे आशीर्वाद होतेच. चापेकर बंधूंच्या बलिदानानं अस्वस्थ झालेल्या सावरकरांनी ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारित मारित मरेतो झुंजण्याची’ शपथ घेतली. ‘अभिनव भारत’ या देशातल्या पहिल्या क्रांतिकारी संस्थेची स्थापना केली आणि ज्योतीने ज्योत पेटत गेली. सावरकरांनी पिस्तुलं आणि बॉम्ब बनवण्याची कृती मिळवली. पांडुरंग बापट यांच्याकरवी कलकत्यात पोहोचवली आणि खुदिराम बोस यांनी देशात पहिला बॉम्बस्फोट घडवला आणि आपल्या मातृभूमीसाठी वयाच्या १९ व्या वर्षी हौतात्म्य पत्करलं. विनायक दामोदर सावरकर या आपल्या धाकट्या भावाला क्रांतिकार्यात मन:पूर्वक साथ देणारे गणेश दामोदर सावरकर अंदमानची वाट चालू लागले. त्यांचं सारं कुटुंब रस्त्यावर आलं. त्याचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध केला. धिंग्रांच्या फाशीने व्यथित झालेल्या अनंत कान्हेरे यांनी हिंदुस्थानात जॅक्सनचा वध केला. (त्यांचे साथीदार कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना कान्हेरे यांच्या समवेत फासावर चढवण्यात आलं तर वामन जोशी यांना १० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली.) कान्हेरे यांचं वय होतं १८. कान्हेरे यांनी जे पिस्तुल वापरलं ते सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलांपैकी एक होतं. त्यामुळे क्रांतिकारकांचे मुकुटमणी सावरकर यांची शिक्षा निश्चित होती आणि सुरु झालं सावरकरांचं अंदमान पर्व. १० वर्षांचा हा कालावधी ‘दोन सीन’मध्ये उरकला गेला नाही. कारण चित्रपट हुड्डा यांनी बनवला आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

सावरकर जरी अंदमानात बंदिस्त असले तरी त्यांनी पेटवलेली क्रांतीची आग प्रज्वलित होत राहिली ती ‘मॅझिनी’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या त्यांच्या ग्रंथांनी. जप्त झालेले ते ग्रंथ घरोघरी पोहोचले, क्रांतिकारकांची गीता ठरले. हे दाखवण्यासाठी हुड्डा यांनी पुण्यातल्या गणेशोत्सवाची पार्श्वभूमी वापरली आहे, त्या कल्पनेला मनापासून दाद द्यायला हवी. श्री गणेशांची जी मूर्ती दाखवली आहे त्यातही कल्पकता आहे. ती मूर्ती आहे भाऊसाहेब रंगारी या पुण्यातील अतिशय जुन्या गणेश मंडळाची. भाऊसाहेब रंगारी हेदेखील क्रांतिकारकांच्या संपर्कात होते, त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं होती, वाड्यात ती लपवण्याची, गुप्त बैठकांची सोय होती. ही सर्व माहिती कळल्यावर, ती गणेशमूर्ती पाहिल्यावर, तोपर्यंत चित्रिकरण पूर्ण होत आलेलं असूनही हुड्डा यांनी गणेशोत्सवाचं चित्रीकरण केलं. याचाच अर्थ माहिती मिळाली तरी त्याची मांडणी योग्य पद्धतीनं करता येणं महत्वाचं आणि ते हुड्डा यांना व्यवस्थित साध्य झालं आहे.

‘हुड्डा यांना चित्रपटात भगतसिंग पण दाखवायचे होते. भगतसिंग कशाला? हे सावरकरांचं बायोपिक आहे ना?’ हा प्रश्नच प्रश्नकर्त्याचं अज्ञान दाखवणारा आहे. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या सावरकरांच्या पुस्तकाचा उल्लेख आला की, अभ्यास असेल तर, त्या ग्रंथातून भगतसिंग यांना मिळालेली प्रेरणा हा फारसा परिचित नसलेला विषय येणारच. रणदीप हुड्डा यांचा ‘अती अभ्यास’ कोणा एकासाठी त्रासदायक ठरला म्हणे, पण त्या अती अभ्यासामुळेच एक चांगला चित्रपट निर्माण झाला हे निश्चित.

अंदमानातल्या केवळ १३ बाय ७ फुटांच्या कोठडीत दिवस अक्षरशः ढकलताना सावरकरांची होत असलेली तगमग, खायला उठलेला वेळ, कोठडीत त्यांनी अस्वस्थपणे मारलेल्या येरझाऱ्या, घाणेरडं अन्न खाऊन, बघून होणार्‍या उलट्या, नैसर्गिक विधीला जाता येत नाही म्हणून झालेली घालमेल आणि त्यासाठी कोठडीचा वापर करावा लागल्यावर स्वत:चीच वाटणारी लाज आणि तरीही मिळालेला दिलासा हे हुड्डा अतिशय समर्थपणे साकारू शकले. कारण ते स्वत: अतिशय संवेदनशील कलाकार आहेत. त्यांनी सावरकरांमधला एक माणूसही या चित्रपटातून लोकांसमोर आणला आहे. सेल्युलर कारागृहात क्रांतिकारकांचे होणारे हाल पहिल्यांदाच इतक्या ठळकपणे दाखवले गेले आहेत. चित्रपट पाहणार्‍यांच्या मनातून ते कधीही पुसले जाणार नाहीत आणि अनेकांना इतिहास वाचनाला प्रवृत्त करतील.

सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार, त्यांच्यावरचे पेन्शन (नव्हे भत्ता), माफीपत्रांचे, गांधी हत्येतील सहभागाचे चुकीचे आरोप हे हुड्डा यांनी अतिशय स्पष्टपणे आणि थेट मांडले आहेत. सावरकरांविषयी कुठलाही आकस नसलेल्यांच्या मनात आता त्याविषयी कुठलाही संदेह उरलेला नाही आणि हेच या चित्रपटाचं खूप मोठं यश आहे.

(हेही वाचा Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा पाहून अभिनेता प्रसाद ओक थक्क, इन्स्टा पोस्ट लिहून केलं कौतुक; म्हणाला…)

केवळ एक तुळशीपत्र देऊन सावरकरांनी अंदमानात धर्मांतरितांची शुद्धी करून घेतली. त्या शुद्धीच्या प्रसंगासाठीदेखील रणदीप हुड्डा यांना दाद द्यायला हवी. हा सावरकरांवरचा चित्रपट असला तरी त्रिवर्ग सावरकर बंधूंव्यतिरिक्त, वासुदेव बळवंत फडके ते चापेकर बंधू, खुदिराम बोस ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक सशस्त्र क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करलं, त्यांची बलिदानी गाथा चित्रपटातून आपल्यासमोर साकारते, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ ही एक खोटी कथा वर्षानुवर्ष पसरवण्यात आली, पण आपल्या देशात इतकं काही घडलं आणि हे आपल्यापर्यंत कधी पोहोचलंच नाही, हीच चित्रपट पाहणाऱ्यांची भावना असते.

१८, २०, २२ वर्षांच्या अनेक तरुण क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं. एकाच्या हौतात्म्यातून दुसरा क्रांतिकारक बलिदानासाठी सिद्ध होत होता. अशा लाखोंच्या त्यागानं आपण आज स्वातंत्र्य उपभोगू शकतो आहोत याची जाणीव या चित्रपटामुळे निर्माण होते आहे. तो इतिहास हुड्डा यांनी अतिशय प्रभावीपणे मांडला आहेच पण पुढे सावरकरांच्या डोळ्यासमोर तरळणारे त्या तरुण हुतात्म्यांचे चेहरे आपल्यालाही त्यांच्या हौतात्म्याची पुन:पुन्हा आठवण करून देतात. आपल्यावर विनाकारण लागलेले लांछन दूर करण्याचा तसंच लाखो क्रांतिकारकांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा खराखुरा इतिहास जनतेसमोर आणल्याबद्दल प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरही रणदीप हुड्डा यांचं कौतुक करत असतील, त्यांना शुभाशीर्वाद देत असतील.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.