ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल दिनकर राणे यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून देशाच्या संरक्षण क्षेत्रात त्याचा विशेष लाभ करून दिला. जमिनीवरून आकाशात क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यासाठी ओळखले जाणारे रियल टाइम सिम्युलेशनचे परीक्षण तंत्र विकसित करण्याचे श्रेय अतुल राणे यांना जाते. अतुल राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मिती आणि संशोधनात योगदान
१९९६ साली अतुल राणे यांनी आरसीआईच्या संगणक विभागाच्या नेतृत्वाखाली अग्नि -१ क्षेपणास्त्राची चाचणी आणि मूल्यांकन करण्याची सुविधा प्राप्त करून दिली. रुससोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती आणि त्यावरील संशोधन करण्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कोअर कमिटीत अतुल राणे हे सुरुवातीपासून होते. चेन्नई येथील गिंडी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून ‘गाईडेड मिसाईल’ या विषयावर पदवी प्राप्त केली. अतुल राणे हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील आहेत. अतुल राणे हे एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, सिस्टम्स सोसायटी ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ एरोस्पेस क्वालिटी अँड रिलायबिलिटी, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.
Join Our WhatsApp Community