वीर सावरकरांकडे देशाच्या सुरक्षेविषयी धोरणात्मक दृष्टीकोन होता – अतुल भातखळकर

154

सध्या वीर सावरकर यांच्या विचारसरणीवर संपूर्ण देश चालत आहे, तसेच मीही वीर सावरकर यांच्या वाटेवरून चालत आहे. देशाच्या सुरक्षेविषयी धोरणात्मक दृष्टीकोन वीर सावरकर यांच्याकडे होता. जगात काय घडू शकते, माझ्या देशाचे हित कशात आहे. याची जाणीव फक्त वीर सावरकर यांना होती, असे विधान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. यावेळी आमदार अतुल भातखळकर बोलत होते.

(हेही वाचा … तर भारतासह आजूबाजूच्या देशांचेही भाग्य बदलले असते – प्रवीण दीक्षित)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव उच्चारल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. कारण वीर सावरकर हे महान असे व्यक्तिमत्त्व होते. या कार्यक्रमात विज्ञान, शौर्य पुरस्कार देण्यात आले, या सर्व गोष्टी सावरकरांच्या जीवनाच्या अविभाज्य अंग होत्या. ज्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा ठराव करणे अवघड होते, त्यावेळी वीर सावरकरांनी वयाच्या १२व्या वर्षी स्वातंत्र्यलक्ष्मी अशा घोषणा दिल्या आणि या देशाच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला.

सावरकरांचे जातीनिर्मूलनाचे काम

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे जेव्हा रत्नागिरीत गेले तेव्हा वीर सावरकरांचे जातीनिर्मूलनाचे काम त्यांनी पाहिले. तेव्हा ते उत्स्फुर्तपणे म्हणाले की, मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, माझे उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे. कारण माझ्या आयुष्यात मी जे करू शकलो नाही ते वीर सावरकरांनी पाच-सात वर्षांत रत्नागिरीमध्ये केले, हे सांगताना आमदार भातखळकर म्हणाले की, या देशात खरे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष कोणी असेल, तर ते फक्त आणि फक्त वीर सावरकरच होते. वीर सावरकर यांनी हिंदू धर्मातील जातीप्रथांवर कठोर प्रहार केले, पण ते करत असताना मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील कुप्रथांवर प्रहार केले. सावरकर हे एका श्रेष्ठ दर्जाचे मानवतावादी होते, असेही ते म्हणाले.

सावरकरांच्या हयातीत मानसन्मान मिळाला नाही

भातखळकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हयातीत जो मानसन्मान मिळायला हवा होता, तो दुर्दैवाने कधी त्यांना मिळाला नाही. स्वातंत्र्यवीरांचे विचार ऐकले असते, तर देशावर १९४८, १९६२च्या युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली नसती, कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी वीर सावरकरांनी म्हटले होते की, देशाच्या सीमा आता रेखांकीत करून त्या मजबूत करा. या कार्यक्रमाला मला बोलवले, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मी कायम म्हणेन स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी काहीही…, अशा भावना भातखळकर यांनी व्यक्त केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.