स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव जेव्हा जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा त्यांच्या वीरतेचे, अत्युच्च समर्पणाचे आणि प्रखर राष्ट्रभक्तीचे स्मरण होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार वीर सावरकर यांच्या नावाने आणि त्यांच्या ट्रस्टतर्फे दिले जात आहेत. त्यामुळे वीरतेचा भाव जपणाऱ्यांनाच ते पुरस्कार दिले जात आहेत, याचाही अतिशय आनंद होतो, असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवार, २२ मे २०२२ रोजी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार २०२२ तसेच शिखर सावरकर पुरस्कार २०२१ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या.
…तर सच्च्या भारतीय सैनिकाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त झाला असता
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शिखर सावरकर पुरस्कारांचे वितरण होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला प्राप्त झाले होते. मात्र अन्य पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, याचा खेद वाटतो. शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार एव्हरेस्ट वीर पद्मश्री सोनम वांग्याल यांना, शिखर सावरकर युवा पुरस्कार सुशांत अवणेकर यांना तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी या संस्थेला प्राप्त होत आहे. मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. सोनम वांग्याल हे एव्हरेस्ट सर करणारे तिसरे भारतीय असले, तरी वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम करून सर्वात लहान वयाचा एव्हरेस्ट वीर होण्याचा बहुमान मिळविला. खरे तर या सच्च्या भारतीय सैनिकाचा आशीर्वाद सुद्धा मला आज प्राप्त झाला असता. मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अत्युच्च समर्पणाचे आणि प्रखर राष्ट्रभक्तीचे स्मरण होते
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव जेव्हा जेव्हा आपण उच्चारतो, तेव्हा त्यांच्या वीरतेचे, अत्युच्च समर्पणाचे आणि प्रखर राष्ट्रभक्तीचे स्मरण होते. आज हे पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने आणि त्यांच्या ट्रस्टतर्फे दिले जात असल्याने वीरतेचा भाव जपणाऱ्यांनाच ते दिले जात आहेत, याचाही अतिशय आनंद होतो. मी प्रत्यक्ष हजर नसलो तरी स्वातंत्र्यवीर सावरकर ट्रस्टला माझ्या सदैव शुभेच्छा आहेत. ट्रस्टची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे आल्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम होतो आहे. मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाल पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि ट्रस्टची संपूर्ण टीम अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांचे या अतिशय सुंदर आयोजनासाठी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community