माझ्या वडिलांनी वीर सावरकरांना दिलेले वचन पूर्ण केले – ग्रूप कॅप्टन निलेश देखणे

129

माझे वडील सुधाकर देखणे यांनी माझ्या अंतर्मनात सावरकरांच्या समाजकार्याची ज्योत प्रज्वलीत केली. वीर सावरकरांच्या सहवासात असताना माझ्या वडिलांनी सावरकरांना वचन दिले होते की, मला मुलगा झाला तर त्याला मी जरूर सैन्यात पाठवेन. त्यांचे वचन त्यांनी पूर्ण केले अशा भावना ग्रृप कॅप्टन निलेश देखणे यांनी व्यक्त केल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार देण्यात येतो. वीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्ताने रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रृप कॅप्टन निलेश देखणे बोलत होते.

(हेही वाचा – वीर सावरकरांकडे देशाच्या सुरक्षेविषयी धोरणात्मक दृष्टीकोन होता – अतुल भातखळकर)

मुंबईतील एनसीसीचा संपूर्ण कारभार ग्रूप कॅप्टन निलेश देखणे सध्या सांभाळत आहेत. ते म्हणाले की, मुंबईतील हुतात्म्यांविषयी आताच्या तरूण पिढीला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे एनसीसीच्या सर्व मुलांसह एक अभियान राबवून स्थानिक नागरिकांमध्ये याबद्दल जनजागृती करण्याची योजना आखली आहे. याचे कारण म्हणजे देशाचा एक नागरिक म्हणून आपली ती नैतिक जबाबदारी आहे. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केली की, आपल्या पाल्याला सैन्यात दाखल करावे. कारण शिस्त ही जीवनात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सैन्यातून मिळू शकते. त्यामुळे सैन्यासंबंधी आपल्या मुलांना जरूर प्रशिक्षण द्यावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.