जम्मू आणि काश्मीर येथे तब्बल १८ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणारे पराक्रमी कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन रक्षक’च्या अंतर्गत प्लाटून कमांडरचा कार्यभार
कीर्ती चक्र विजेते सुभेदार संतोष राळे हे २७ ऑगस्ट १९९४ रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले होते. भारतीय सैन्यात सक्षमपणे सेवा देण्यासाठी त्यांनी सैन्याचे शारीरिक प्रशिक्षण, कमांडो कोर्स आणि प्लाटून कमांडर सोर्स पूर्ण केला होता. जम्मू-काश्मीर, अंदमान निकोबार, भूतान आणि लेबनान येथे सुभेदार राळे हे सैन्याचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट २००८ मध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन रक्षक’ च्या अंतर्गत प्लाटून कमांडरचा कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी त्यांना एका रात्री १८ दहशतवादी येणार अशी माहिती मिळाली होती. हाडे गोठवणाऱ्या थंडीतही त्यांनी साथीदारांच्या साहाय्याने रात्रीच दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्यांनी स्वतः साहसाने १८ दहशतवाद्यांना ठार केले. या पराक्रमाकरता सुभेदार राळे यांना २६ जानेवारी २००९ रोजी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान आला होता.
Join Our WhatsApp Community