गिर्यारोहणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाकरिता द्वितीय शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार सुशांत अणवेकर यांना प्रदान करण्यात आला. अणवेकर नोकरीनिमित्त मुंबईत आल्यानंतर त्यांना ट्रेकिंगचा छंद जोपासताना गिर्यारोहणाची दिशा मिळाली. मूळचे कारवार, कर्नाटक येथे राहणारे अणवेकर यांनी आतापर्यंत बेसिक, ऍडव्हान्स व सर्च अँड रेस्क्यू असा गिर्यारोहणातला अभ्यासक्रम दार्जिलिंगच्या हिमालयन माऊंटेनिअरिंग इंस्टिट्यूट या संस्थेत पूर्ण केला. ट्रान्स सह्याद्री ट्रेक, ट्रान्स सह्याद्री सायक्लोथॉन, एक हिमालयन शिखर या मोहिमा त्यांनी यशस्वीपणे केल्या आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला.
सह्याद्रीमधील २६ किल्ल्यांना भेटी दिल्या
सुशांत अणवेकर यांनी २०१८ मध्ये महाराष्ट्रात गुजरात सीमेनजीक असलेल्या साल्हेर किल्ला ते कर्नाटकमधील त्यांचे गाव हे सुमारे १२०० किलोमीटर इतके अंतर ४० दिवसांमध्ये पायी पूर्ण केले. ट्रान्स सह्याद्री अर्थात पश्चिम घाट भागातील डोंगररांगेतील हा प्रवास होता. या मोहिमेअंतर्गत त्यांनी सह्याद्रीमधील सुमारे २६ किल्ल्यांना भेटी दिल्या. २०१५ मध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने ट्रेकिंगला सुरुवात केली होती. ती प्राथमिक स्तरावरील होती. हौसेमुळे आठवड्याच्या शेवटी कुठे ना कुठे डोंगरावर जात, कोणी सोबतीला असेल तर ठीक नाहीतर अगदी एकट्याने जाण्याचेही त्यांनी धाडस केले. साल्हेर गडाच्या पूर्वेला ११ किलोमीटर वर असलेल्या अलियाबाद या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास कारवारमधील सिद्दर या त्यांच्या गावी संपला.
Join Our WhatsApp Community