१९७१ च्या बांगलादेशच्या लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगलादेशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला पुरते नमवले होते. मात्र त्यासाठी इन्फन्ट्रीने ३१ जवानांना गमावले. १२५ जवान गंभीर गंभीर जखमी झाले. अर्ध्याहून अधिक जवान जखमी होऊही त्यांनी लढाई केली होती. ३ डिसेंबर १९७१ ते १६ डिसेंबर १९७१ या दरम्यान ते युद्ध झाले आणि या युद्धाला पन्नास वर्षे होत आहेत. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी एका ऑनलाइन संवादात बोलताना सांगितले.
(हेही वाचा – ज्योतिर्लिंग मंदिरांबद्दल माहितेय? तर सहभागी व्हा, केंद्राच्या अनोख्या प्रश्नमंजुषेत…)
मेजर आओ आणि हवालदार काशिनाथ बोडके यांना सेना मेडल पुरस्कार मिळाले. अनेक वर्षानंतर कर्नल आओ जे नागा होते, यांचा मुलगा लेफ्टनंट शशी याने ७ मराठा मध्ये प्रवेश केला आणि आपल्या वडिलांप्रमाणे त्यांनी ७ मराठा बरोबर वेगवेगळ्या युद्धभूमीवर वीस वर्षे पलटणीमध्ये सेवा केली. यावेळी ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर विजयकुमार मोरे म्हणाले की, आपण १९६९ मध्ये लष्करात रुजू झालो. त्यावेळी नागलँडमध्ये होतो, तेथेही कामगिरी केली. आमच्या रेजीमेंटला पुरस्कार मिळाले. त्यावेळी ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान तेथून हलवले आणि सिलीगुडीला जाण्याचा आदेश मिळाला, नंतर बागडोगराला गेलो. तेथे अधिकाऱ्यांनी पुढील लढाईसंबंधात आदेश दिला. गेला. त्यानुसार प्रथम पाचागडला हल्ला करावयाचा होता. त्यात आमच्या बटालियनने चांगले काम केले, पाकिस्तानचे अनेक सैनिक मृत्युमुखी पडले शत्रुच्या सैनिकांमधील काहींनी आपले सामान सोडून पलायन केले.
…आणि तेथे कब्जा केला
ते म्हणाले की, पाकिस्तानी सैनिक अंडरग्राऊंड बंकरमध्ये असल्याने त्यांचा ठाव कळत नव्हता. ते भुयारात नेमके कुठे असतात, ती माहिती काढली. बटालियनचा तोफखाना पुढे नेत व पाकिस्तानच्या मोर्चावर हल्ला करून ते परत आल्यानंतर पाकिस्तानी सैनिक तेथे फायर लाइट मशीनगननी करायचे त्यावरून त्यांच्या तयारीची, ठिकाण्याची माहिती समजून घेत होतो. ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर दयानंद मांढरे यांनी सांगितले की, युद्ध जरी ३ ते १६ डिसेंबर असे झाले असले तरी प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्येच ७ मराठाने युद्धाला सुरुवात केली होती. त्यासाठी युद्धाच्या आधी शत्रुला त्रास देण्यासाठी हल्ला करायचा आणि शत्रुला विश्रांती घेऊ न देण्याचे काम केले. त्यानंतर पाचागडला हल्ला करण्याचा आदेश मिळाला २६ तारखेला पाचागडवर त्यानुसार हल्ला केला. तेव्हा कारखानीस साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ची घोषणा दिली आणि मग युनिटने त्यांना प्रतिसाद देत पाकिस्तानी सैनिक असलेल्या तागाच्या गोदामावर एकसाथ हल्ला केला. त्यानंतर तेथे कब्जा केला. पाकिस्तान्यांनी पूल नष्ट केले तेव्हा नदीत गळाभर पाण्यातून जातही वाटचाल केली. तर काहीकाही ठिकाणी भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी लोखंडी पूल एका रात्रीत नीट करून देऊन आमचा पुढे जाण्यासाठी वाहनमार्गही सुकर केला होता.
त्या रात्री जेवण करायची इच्छा होत नव्हती
कांतानगर पुलावर हल्ला करण्यापूर्वी रणगाड्याबरोबर जाऊन हल्ला करून परतायचे असा बेत होता. मात्र त्यावेळी लान्सनायक तुकाराम करांडे यांना शत्रुच्या बॉम्बहल्ल्यात त्यांना प्राण गमवावे लागले. ही पहिलीच दुर्घटना होती मात्र या प्रकारामुळे त्या रात्री जेवण करायची इच्छा होत नव्हती. तेव्हा कारखानीस साहेबांनी धीर देऊन उत्साह वाढवला असेही मांढरे यांनी सांगितले. ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर जयराम मुळीक म्हणाले की, आपण १९६३ ते १९९० पर्यंत सेवेत होतो. या युद्दात कर्नल बेडकीकर होते. नागलँडवरून आम्ही पाचागडला आलो, तेथून पुढे पहिला हल्ला २६ नोव्हेंबर १९७१ ला केला. कारखानीस व प्लॅटुन कमांडर विष्णु पाटील होते. सायंकाळी संपर्क तुटला पाचागडच्या गोदामामागे लपलो, नंतर पुढे मजल मारली त्यात विष्णु पाटील लढाईत बेपत्ता होते. ते सापडले नाहीत. तेथून पुढे कांता पुलावर गेलो तेथे पाकिस्तानने पूल तोडला होतो. पाण्यातून वाटचाल केली सकाळी सात वाजता पाकिस्तानी तोफखाना चालू होता, तरीही पुढे लढत राहिलो. त्यात आमचे जवान जखमी झाले, प्राणही गमावले. त्यानंतर दुपारी मला शेल लागून जखमी झालो आणि मग बागडोगराला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हेमंत महाजन म्हणाले की, ७ मराठा चे कर्नल बिडकीकर (सीओ) यानी नेतृत्व केले. टूवायसी होते मेजर फ़ड्निस त्यांनी चांगले काम केले. ते इंदूरचे होते. कंपनी कमांडर होते मेजर निजामुद्दीन- मंंगलोर, मेजर जाधव, मेजर काखानीस, कॅप्टन विजय पाटील. यांनी चांगले काम केले. या युद्धात मेजर निजामुद्दीन यांच्या तोंडात गोळी लागली होती मात्र या हल्ल्यातही ते जिवंत राहिले. प्रताप साळुंके यांच्या पायातून गोळी गेली, तरीही त्यावेळीही त्यांनी नेतृत्व केले. मेजर फडणीस यांनीही जवानांना धीर देत मार्गदर्शन केले. या लढाईमध्ये कॅप्टन तांबे यांना सेना मेडल, सुभेदार दौलतराव फडतरे यांना सेना मेडल मरणोत्तर, हवालदार मनोहर राणे यांना सेना मेडल मरणोत्तर हे पुरस्कार मिळाले .याशिवाय शिपाई नारायण मालुसरे आणि शिपाई जानु चव्हाण यांना पण सेना मेडल या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फंट्रीचे योगदान
पाकिस्तानी सैन्याने लिहिलेल्या इतिहासामध्ये ७ मराठा लाईट इन्फंट्रीचे नाव नोंदवण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की पाचागड आणि कांता नगर मध्ये ७ मराठाने पुन्हा पुन्हा हल्ला करून आम्हाला हरवले. युद्धानंतर शत्रूच्या एक पूर्ण ब्रिगेडने ७ मराठा लाईट इन्फंट्री समोर आत्मसमर्पण केले. पुढचे काही दिवस या युद्धकैद्यांना आपल्या ताब्यात ठेवायचे आणि त्या त्यांची रक्षा करायची जबाबदारी ७ मराठाला मिळाली होती. युद्ध संपल्यानंतर देशाचे यावेळीचे संरक्षणमंत्री श्री. जगजीवनराम ७ मराठाला भेटण्याकरता खास आले होते.
रविवारी १२ डिसेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या या ऑनलाईन संवादामध्ये त्यांनी या युद्धात सहभागी झालेल्या त्यावेळच्या जवान आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून युद्धातील आठवणींना जागे केले. यामध्ये त्यांनी ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर जयराम मुळीक, ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर दयानंद मांढरे, ऑनररी कॅप्टन आणि सुभेदार मेजर विजयकुमार मोरे यांच्यासोबत संवाद साधला.
या युद्धात सात मराठा लाइट इन्फन्ट्रीने जे जवान गमावले म्हणजेच ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देशासाठी दिले त्यात हवालदार मनोहर राणे, पेडलान्सनाईक परशुराम रेवंडकर, शिपाई शंकर माने, पेडलान्सनाईक गणपत पार्चे, शिपाई बनसोडे, बाबू इंगळे आणि रमेश जगनाडे, तुकाराम करांडे आणि बलवान नरके, सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार बळीराम विचारे, लान्स हवालदार रामकृष्ण बोरलीकर, पेडलान्सनाईक आशाराम तानपुरे, शिपाई हनुमान कोलपे, शिवाजी जगदाळे, गणपत सकपाळ, विठ्ठल शिरसाट, अंकुश तारी, मनप्पा चव्हाण, रामचंद्र देसाई, रघुनाथ सावंत, व्यंकटराव देशमुख, महादेव परब, रमेश इंगवले, बाळकृष्ण जाधव, विजय कोतवाल यांचा समावेश आहे.
डॉक्टर तांबे देवदूतच वाटायचे
युद्धात डॉक्टर कॅप्टन तांबे हे आम्हाला देवदूतच वाटत, त्याबद्दल विजयकुमार मोरे यांनी सांगितले की, ते जखमी सैनिकांवर उपचार करीत, अगदी प्रत्यक्षा युद्धाच्या ठिकामी जाऊन, आघाडीवर जातून वैद्यकीय स्टाफला नेत त्यांनी जखमी कैद्यांवर उपचार केले होते. त्यांच्यामुळे आम्हाला खूप धीर येत असे.
Join Our WhatsApp Community