‘शिखर सावरकर २०२०’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!

शुक्रवारी, ९ जुलै २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात छोटेखानी समारंभाचे आयोजन करून या पुरस्काराचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले.

160

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा ‘शिखर सावरकर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. वर्ष २०२०मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे जनहितार्थ २३ ऑगस्ट २०२० या दिवशी या पुरस्कार विजेत्यांची केवळ नावे घोषित करण्यात आली होती. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी, ९ जुलै २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात छोटेखानी समारंभाचे आयोजन करून या पुरस्काराचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यावेळी पुरस्कार विजेते व्यक्ती, तसेच संस्थांचे प्रतिनिधी यांना सन्मान पत्र आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रप्रेम आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले, तसेच राष्ट्रकार्यासाठी शारीरिक, मानसिक आणि वैचारिक पातळीवर सक्षम असणे गरजेचे आहे, अशी शिकवणही दिली. स्मारकही त्याच विचारांना अनुसरून भावीपिढी घडवण्यासाठी विविध क्रीडा प्रशिक्षण वर्ग चालवत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गिर्यारोहण याचाही सामावेश आहे. त्यानुषंगाने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘शिखर सावरकर पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिखर सावरकर पुरस्कार विजेत्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्यात आले नव्हते. परंतु पुरस्काराची रक्कम ऑनलाईन पद्धतीने संबंधितांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. सन्मान पत्र आणि स्मुतीचिन्ह मात्र शुक्रवार, ९ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर आणि समिती सदस्य उपस्थित होते.

(हेही वाचा : २३ ऑगस्टला ‘शिखर सावरकर पुरस्कार’ सोहळा)

‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२०’

कर्नल (निवृत्त) प्रेमचंद यांना ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोणावळा, जिल्हा पुणे येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेला ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला. तर ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२०’ हा सुरज मालुसरे या युवकाला प्रदान करण्यात आला.

‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’

गिर्यारोहण, दुर्ग संवर्धन, क्रीडा प्रोत्साहन आणि सेवा कार्य यांसाठी शिवदुर्ग मित्र या संस्थेला ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १९८० साली वि.का. गायकवाड यांनी सुरु केलेली ही संस्था दुर्ग संवर्धनाचे कार्य करता करता कालांतराने या संस्थेतील गिर्यारोहक उंच घाटमाथ्यावर होणाऱ्या अपघातात बचाव कार्य नि:शुल्क करू लागले. या संस्थेचे प्रतिनिधी योगेश उंबरे, ओमकार पडवळ, अनिकेत देशमुख, प्रवीण ढोकळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

(हेही वाचा : वीर सावरकरांच्या जयंतीदिनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्काराचे आयोजन)

‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२०’

गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२०’ पुरस्कार सुरज मालुसरे यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रॉक क्लाइंबिंग आणि आर्टिफीशियल वॉल क्लाइंबिंग यात त्यांनी कमी वयातच प्राविण्य मिळवले आहे. सह्याद्रीच्या सरळ उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे गड -किल्ले त्यांनी यशस्वीपणे सर केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.