इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर 

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना २ मे १९२० रोजी अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेतून मुक्ती मिळाली. या दोन्ही वीरांना भारतात आणले गेले, तरीही त्यांची ना शिक्षा संपली ना यातना. असा अनन्वित अत्याचार सहन करूनही जाज्वल्य इच्छाशक्तीच्या जोरावर वीर सावरकर यांनी राष्ट्र, धर्म आणि समाजप्रबोधनाचे महान कार्य केले.  

पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश सैन्यदलात मुसलमानांची वाढती संख्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदूंसाठी घातक ठरेल, असा आगाऊ इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिला होता, परंतु त्यावेळी त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, तरीही त्यावेळेच्या तरुणाईने वीर सावरकरांच्या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून सैन्यात प्रवेश केला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात मोठ्यासंख्येने भारतीय सैनिक आझाद हिंद सेनेला जाऊन मिळाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात मुसलमानांची संख्या ३५ टक्के होती, त्याची परिणती मुसलमानांनी लढून पाकिस्तान मिळवला, आजही भारतातील काही राज्यांत मुसलमानांची संख्या सर्वाधिक बनली आहे, यातून फाळणीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिला.

…तर २०४७ मध्ये आणखी एक फाळणी!

१९१९ मध्ये देशभरात स्पॅनिश फ्लूचा संसर्ग पसरला होता, त्यामध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के लोकसंख्येचा या महामारीत मृत्यू झाला होता. २०१९ पासून अशाच महामारीचा इतिहास पुनर्जीवित झालेला आपण अनुभवत आहोत. अशाच सामाजिक आणि राजकीय स्तरावरील इतिहासाचीही पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. मुसलमानांची संख्या देशात अशीच वाढत गेली, तर २०४७मध्ये मुसलमान लोकसंख्येच्या जोरावर देशाचा आणखी एक तुकडा पाडतील. आज मुसलमानांची लोकसंख्या २२ टक्के आहे. मात्र त्यांची लोकसंख्या कायम वाढत आहे आणि तीच २०४७च्या आगामी संकटाची चाहूल देत आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.

खिलाफत चळवळीची पुनरावृत्ती!

त्याकाळी मुसलमानांनी खिलाफत चळवळ चालवली होती. वास्तविक त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नव्हता, तरीही गांधींनी त्याचे समर्थन केले. त्याचा गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंध जोडला. ज्यामध्ये हिंदूंचा सहभाग होता. आज शंभर वर्षांनंतर भारतात ‘सीएए’ च्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ज्याप्रकारे खिलाफत चळवळीशी हिंदूंचा काहीही संबंध नसताना गांधींनी त्याला पाठिंबा दिला होता, तसा पाठिंबा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘सीएए’ च्या विरोधातील  आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.

दिल्लीत मोपल्यांच्या दंगलीची झलक! 

केरळात मोपला मुसलमानांनी दंगली घडवल्या. यात मोठ्या संख्येने हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्यांची हत्या करण्यात आली. हिंदू महिलांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तेव्हा असे सांगितले जात होते कि, केरळमधील विहिरी आणि तलाव हे मृत आणि घायाळ हिंदूंनी भरले होते. मोपल्यांचे ते आंदोलन ब्रिटिशांनी सैनिकी बळाचा वापर करून मोडून काढले. गांधींनी मात्र त्या मोपल्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांचा ‘मोपला बंधू’ म्हणून उल्लेख केला. त्याच दंगलीची छोटी पुरावृत्ती ही दिल्लीची दंगल होती. ज्यामध्ये हिंदूंना ठार करण्यात आले, त्यांची घरे जाळण्यात आली, असे रणजित सावरकर म्हणाले.

हिंदू संघटनाची आवश्यकता! 

वीर सावरकर यांनी सुरुवातीपासूनच हिंदू संघटन करण्यावर जोर दिला होता. त्यानंतर हिंदू महासभाच्या माध्यमातून त्यांनी हिंदूंचे राजकीय संघटन उभे करणे सुरु केले. कारण १८७५च्या सुमारास सर सय्यद अहमद खान याने मदरसतुलउलूम नावाने मुसलमानांसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था सुरु केली. ज्याचे रूपांतर नंतर विद्यापीठामध्ये झाले. जे सध्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्यावेळी मुसलमान केवळ २० टक्के होते. असा परिस्थितीत ब्रिटिश भारतातून निघून गेल्यावर मुसलमानांची काय परिस्थितीत होईल, या भीतीपोटी सर सय्यद अहमद याने  मुसलमानांना शिक्षित करून त्यांना ब्रिटिशांचे समर्थक बनवले. वीर सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकातून म्हटले आहे कि, भारतात द्विराष्ट्रवाद खऱ्या अर्थाने येथूनच सुरु झाला. त्यानंतर १९०८-०९ मध्ये मुसलमानांना स्वतंत्र संविधानाच्या जोरावर बळ देण्यात आले. या सर्वाचा अंदाज वीर सावरकर यांना सर्वात आधी आला होता. म्हणूनच त्यांनी हिंदूंसाठी स्वतंत्र राजकीय संघटन उभे करण्यावर जोर दिला होता. याचा स्पष्ट अर्थ निघतो कि, अंदमानात असतानाच वीर सावरकर यांना देशातील आगामी संकटांची चाहूल लागली होती, ज्या संकटांचा काँग्रेसने कधीच विचार केला नव्हता, असेही रणजित सावरकर म्हणाले.

 ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी’ निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन!

१९४७ मध्ये आपला भूगोल बदलला, आता तो पुन्हा एकदा बदलण्याच्या वाटेवर आहे. म्हणून हिंदूंना जागृत करून त्यांचे संघटन करण्याची पुन्हा एकदा गरज बनली आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांच्या काळेपाणी मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचे स्मरण करून हिंदुत्वाचा जागर करायचा आहे, असेही रणजीत सावरकर म्हणाले. यानिमित्ताने देशभर वीर सावरकरांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु देशभरात कोरोना महामारीमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आणि त्याऐवजी ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालाचे संचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे करत आहेत. या व्याख्यानमालेचे उदघाटन वीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या ‘सावरकर और हिंदू संगठन’ या विषयावरील व्याख्यानाने झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here