स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळा! “वीर सावरकर धर्माभिमानी होते, पण धर्मांध नव्हते!” 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य आणि सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  

118

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे विज्ञान आणि त्याअनुषंगाने प्रयोगशीलतेसाठी आग्रही असायचे. त्यांनी विज्ञानाला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी धार्मिक रूढी-परंपरा यांच्याकडे विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिले, त्यांची चिकित्सा केली, त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले, असे असले तरी वीर सावरकर हे धर्माभिमानी होते, पण धर्मांध नव्हते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी मांडले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार २०२१

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ यंदाच्या वर्षी गलवान घाटीमध्ये हौतात्मा पत्करलेले भारतीय लष्कराचे कर्नल बी. संतोष बाबू यांना मरणोत्तर देण्यात आला. वीर सावरकर यांची मूर्ती, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख १ हजार १०१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी वीरपत्नी संतोषी संतोष बाबू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी वीरपत्नी संतोषी यांनी वीर सावरकर यांनी १८५७च्या प्रथम स्वातंत्र्य चळवळीवर लिहिलेल्या ग्रंथाचा उल्लेख करत वीर सावरकर यांचे राष्ट्र कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

(हेही वाचा : माझी जन्मठेप मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक)

स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार २०२१

‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाज सेवा पुरस्कार’ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, पुणे यांना देण्यात आला. वीर सावरकर यांची मूर्ती, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांचे आभार व्यक्त केली.

ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला! 

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे यासंबंधीच्या नियमांचे पालन करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी वीर सावरकर यांचे विचार, हिंदुत्व आणि त्यांनी केलेले कार्य मांडले. तर ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी मागील वर्षी चिनी सैनिकांनी गलवान घाटीमध्ये जे आक्रमण केले. त्याचा भारतीय सैनिकांनी केलेला प्रतिकार याची माहिती दिली. लेफ्ट. जनरल (निवृत्त) अश्विनीकुमार बक्शी यांनी हुतात्मा संतोष बाबू यांच्या पराक्रमाविषयी माहिती दिली.

(हेही वाचा :अखेर ठाण्यातील हिरानंदानी मेडोज उद्यानाला वीर सावरकरांचे नाव!)

वीर सावरकर यांचे हिंदी भाषांतरित गीत प्रदर्शित! 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रसिद्ध गीत ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’ हे गीत हिंदी भाषेत भाषांतरित केलेले ‘ले चल मुझको’ हे गीतही प्रदर्शित करण्यात आले. प्रसिद्ध गायक शंकर गायकर यांनी हे गीत गायले आहे, वर्षा भावे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि सुप्रसिद्ध कलाकार उर्मिला कोठारे यांनी यावर नृत्याविष्कार सादर केला आहे. या गीताची संकल्पना रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर आणि स्वप्नील सावरकर यांची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हे गीत बनवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी स्मारकाचे कार्य आणि पुरस्कारांची माहिती दिली. तसेच आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम’ने झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.