स्वातंत्र्यवीर सावरकरः एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व… वज्रनिश्चयी ‘क्रांतिकारक’ आणि थोर ‘समाजसुधारक’- डॉ. नीरज देव

बुद्धीप्रामाण्यवादी सावरकरांनी कायमच विज्ञाननिष्ठ जगाचा पुरस्कार केला. जाती-पाती, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेदांची भारतीय समाजाला लागलेली वाळवी काढून टाकण्यासाठी सावरकरांनी महान कार्य केले. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर ख-या अर्थाने भारतरत्न ठरतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर… असामान्य देशभक्तीचं मूर्तिमंत प्रतिक. पारतंत्र्याच्या बेड्यांतून भारतभूला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला त्याग, सोसलेल्या यातना, स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला वज्रनिश्चय, याची नोंद देशाच्याच नाही तर जगाच्या इतिहासात झाली आहे. पण केवळ देश स्वतंत्र करुन हेतू साध्य होणार नाही, तर देशातील समाज सुद्धा सुधारला पाहिजे, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केव्हाच ओळखले होते. म्हणूनच ते केवळ क्रांतिकारकच नाहीत, तर एक थोर समाजसुधारकही आहेत. बुद्धीप्रामाण्यवादी सावरकरांनी कायमच विज्ञाननिष्ठ जगाचा पुरस्कार केला. जाती-पाती, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेदांची भारतीय समाजाला लागलेली वाळवी काढून टाकण्यासाठी सावरकरांनी महान कार्य केले. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर ख-या अर्थाने भारतरत्न ठरतात.

धर्मग्रंथ न मानणारे सावरकर, सर्व धर्मग्रंथांचा कायम आदर मात्र करत असत. विज्ञान हेच प्रत्येक धर्माचे मूळ असावे, अशी स्वांतत्र्यवीर सावरकरांची विचारधारा होती. चिरंतन आणि कायमच नव्या गोष्टींचा स्वीकार करणारा धर्म हाच खरा सनातन धर्म, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी या ऑनलाइन व्याख्यानमालेतील १० मे रोजी झालेल्या व्याख्यानात डॉ. नीरज देव बोलत होते.

सावरकरांचे विचार हजारो क्रांतिकारकांना प्रेरणादायी

मॅझिनीप्रमाणे अखंड जगताच्या क्रांतीविश्वात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श अनेक तरुणांसमोर आहे. भारतीय स्वातंत्र्य समरातील सशस्त्र क्रांतिकारकांचे तर सावरकर मुकुटमणीच. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, ही वज्रकठोर तत्त्वं आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ती पुसली जाणार नाहीत. 1857चे स्वातंत्र्यसमर आणि जोसेफ मॅझिनीचे चरित्र हे सावरकरांच्या लेखणीतून साकार झालेले अद्भूत ग्रंथ आहेत. 1857च्या स्वातंत्र्यसमरामुळे प्रेरित होऊन हजारो क्रांतिकारक तरुणांचा उदय झाला, असे म्हटले जाते.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व

नीरज देव म्हणाले की, हजार वर्षांनंतर जर कोणी सावरकरांबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यासमोर फार मोठा संभ्रम निर्माण होईल. कारण वीर सावरकरांचं कर्तृत्त्वच इतकं बहुआयामी आहे की, सावरकर एक आहेत की अनेक आहेत हेच कळणे कठीण होऊन जाईल. सावरकरांचं संपूर्ण जीवनंच इतकं बहुआयामी आहे, असे नीरज देव म्हणाले.

अॅटलीने दिला सावरकरांच्या दूरदृष्टीचा पुरावा

काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य हे अविरत चालत होते. त्यांनी भारतीय सैनिकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. याचमुळे भारतीय सैनिक हे कधीही विद्रोह करुन उठतील आणि त्यांना थोपवण्याची ताकद इंग्रजांमध्ये नाही, असे इंडियन इंडिपेंन्डन्स अॅक्टमध्ये तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांनी म्हटले होते. सावरकरांच्या दूरदृष्टीचा हा एक पुरावाच आहे.

पराकोटीचे हिंदुत्त्व

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्त्व हे पराकोटीचे होते.

आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत: ||

म्हणजेच, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. ही सावरकरांनी केलेली हिंदुत्त्वाची सोपी आणि व्यापक व्याख्या.

थोर साहित्यिक सावरकर

सावरकरांचं साहित्य पाहिलं की त्यातून हे स्पष्ट होतं की, त्यांच्या देशभक्तीप्रमाणेच त्यांच्या लेखणीलाही कुठल्याही सीमा नव्हत्या. चरित्रकार, निबंधकार, महाकवी, नाटककार यांसारखे अनेक पैलू त्यांच्या लिखाणात दिसून येतात. सावरकरांनी आपल्या लेखणीने जुलूम करणा-या जगातील सर्व परकीय शक्तींना अक्षरशः हादरवून टाकले होते. त्यांची दूरदृष्टी ही त्यांच्या लिखाणात प्रतित होते. त्यांनी दिलेली भाषणे, व्याख्याने ही आजही जगाला प्रेरणादायी आहेत.

जातीनिहाय आरक्षणाला विरोध

सावरकरांना जातीवर आधारित आरक्षण कधीही मान्य नव्हते. आरक्षण द्यायचेच असेल, तर आर्थिक आधारावर देणे योग्य आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते. जातीनिहाय आरक्षणामुळेच समाजात जातीयवादाची मुळे अधिक घट्ट झाली आणि तो दृढ झाला व समाजाचा सर्वांगिण विकास खुंटला, असे सावरकरांचे म्हणणे होते.

समाजसुधारणेसाठी मोलाचे योगदान

समाजात चालत आलेल्या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा सावरकरांनी कायमच तीव्र विरोध केला. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना त्यांनी या जाती-भेदांच्या भिंती नेस्तनाभूत करण्यासाठी महान असे कार्य केले. त्या काळात असणा-या सिंधू बंदी, स्पर्श बंदी, व्यवसाय बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, वेद बंदी आणि शुद्धी बंदी या सात बेड्यांनी हिंदू समाजाला जखडून ठेवले होते. जातीभेदाची वर्षानुवर्ष रुजलेली मुळे ही आपल्या राष्ट्राच्या उभारणीत अडथळा ठरत आहेत, हे सावरकरांनी ओळखले होते. आधुनिक भारताची जडणघडण करायची असेल, तर ही मुळं नष्ट करणं गरजेचं आहे, यासाठी सावरकरांनी अनेक प्रयत्न केले.

अस्पृश्यतेच्या मुळावर कु-हाड घालायची तर प्राथमिक शाळांतून पूर्वास्पृश्य मुलांना स्पृश्यांप्रमाणेच वागणूक मिळावी यासाठी त्यांनी भाषणे, लेख या मार्गाने लोकांचे विचार पालटण्यासाठी चळवळ उभी केली. अस्पृश्यांच्या मुलांना सावरकर स्वतः गीतेचे अध्याय, रामरक्षा आणि गायत्री मंत्र शिकवत आणि मोठमोठ्या समारंभात ते लोकांसमोर म्हणायला लावत. आपले वेद, तत्त्वज्ञान परकीय लोक अभ्यासत असताना, तुम्ही स्वकीयांना ते वाचण्यास आणि म्हणण्यास बंदी का करता? देवाला न मानणारा म्लेंच्छ किंवा इंग्रज अधिकारी पायात बूट घालून, हातात संगीन घेऊन देवळात घुसला तर तुमचा देव विटाळत नाही आणि देवाच्या भक्ताने, तथाकथित अस्पृश्य हिंदूने स्नान करुन त्यात प्रवेश केला, तर देऊळ विटाळते ही तुमची समजूत आत्मघातकी आहे आणि ती सोडलीच पाहिजे, असे सावरकर ठामपणे सांगत. अस्पृश्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार काढून घेण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही, असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here