स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्र सुरक्षेचे पिताच- उदय माहुरकर

चीन भारत भूमीवर आक्रमण करुन आपला भूभाग काबीज करण्याचा प्रयत्न करेल, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ओळखले होते. पण तरीही नेहरुंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणणे ऐकले नाही आणि पुढे व्हायचे तेच झाले. 

87

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय राष्ट्रसुरक्षेचे पिता असून त्यांनी विभाजनापूर्वी, विभाजनासंबंधात वेळोवेळी दिलेले इशारे आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्याने भारताला भविष्यात शांततेने झोप लागणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्याची सत्यता आजही दिसून येते. चीनच्या आक्रमणाबाबतही त्यांनी चार वर्ष आधीच इशारा दिला होता, सावध केले होते. सैनिकीकरणाबाबत सावरकरांनी दिलेले मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच खरे म्हणजे हिंदुराष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार होईल, असे देशाचे माहिती आयुक्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक उदय माहुरकर यांनी शनिवारी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने शनिवार दि. ८ मे २०२१ रोजी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमालेतील हे चौथे व्याख्यान होते. ‘हिंदुत्वपर समझोता नही’ या विषयावर ते बोलत होते.

… म्हणून सावरकरांचा पंचशील कराराला विरोध

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी. सैन्यात हिंदुंची संख्या कमी आहे, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1938 सालीच ओळखले होते. म्हणून त्यांनी जास्तीत जास्त हिंदूंना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. यामुळे हिंदुंची मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती झाली आणि त्याचा फायदा आझाद हिंद सेनेला झाला. चीन भारतावर आक्रमण करेल, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आठ वर्षांपूर्वीच ओळखले होते. म्हणूनच जवाहरलाल नेहरुंनी आणलेल्या पंचशील कराराला सावरकरांनी विरोध केला. कारण या कराराचा स्वीकार केला, तर चीन भारत भूमीवर आक्रमण करुन आपला भूभाग काबीज करण्याचा प्रयत्न करेल, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ओळखले होते. पण तरीही नेहरुंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणणे ऐकले नाही आणि पुढे व्हायचे तेच झाले.

(हेही वाचाः इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर )

राष्ट्रवादी मुसलमानांना सावरकरांनी दिले हिंदुराष्ट्रात स्थान

सावरकरांच्या हिंदुत्त्वाचा विचार करता त्यांचा हिंदुत्त्ववाद हा राष्ट्रवाद होता. त्यांना अपेक्षित असलेला राष्ट्रवाद हा नीट समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नाही, तसेच चांगले प्रशासन असणे आणि धर्माचा अतिरेक नसणे, असा राष्ट्रवाद किंवा ‘नो कॉम्प्रमाईज्ड हिंदुत्त्व’ स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु महासभेचे अध्यक्ष झाले, तेव्हा लोकांना त्यांनी कर्णावती येथील अधिवेशनातही हिंदुत्त्व म्हणजे काय ते स्पष्टपणे सांगितले होते. हिंदुराष्ट्रात सर्व जाती, धर्माच्या लोकांना समान अधिकार असतील. अल्पसंख्यांकही जी त्यांची पूजा-अर्चना आहे ती करू शकतील. मात्र हिंदु राष्ट्रात अन्य धार्मिक राष्ट्रे बनण्याची परवानगी देणार नाही. राष्ट्रवादी मुसलमानांना त्यांच्या हिंदुराष्ट्रात जागा होती, असेही माहुरकर यांनी सांगितले.

काँग्रेसने केले मुसलमानांचे लांगूलचालन

स्वातंत्र्यासाठी जे मुसलमान काम करू इच्छित आहेत, त्यांनी आमच्याबरोबर यावे, त्यांचे स्वागत आहे. मात्र ते नसतील तर त्यांच्याविना आम्ही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. हिंदू-मुसलमान ऐक्याविना स्वातंत्र्य मिळवणे शक्य नाही, असे काँग्रेस मानत होती. त्यातून त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन केले. मुस्लीम लीगने त्याचा फायदा उठवला. सावरकरांनी सतत इशारे दिले, मात्र काँग्रेसने ऐकले नाही. त्यांची मते काँग्रेसने ऐकली असती, तर फाळणीही टळली असती, असेही माहुरकर म्हणाले. काँग्रेसकडून पॅन इस्लामिक वृत्तीला जोपासले गेले. मुळात मानवाधिकाराच्या नावाखाली दहशतवाद्यांनाही पाठिंबा दिला गेला, अशीही टीका त्यांनी मागील सरकारांवर केली. सर्व मुसलमान वाईट नाहीत. चांगल्या मुसलमानांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्यापुढे काही गोष्टी स्पष्ट ठेवल्या, तर अतिरेकी विचारांचे मुसलमान एकाकी पडतील, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

(हेही वाचाः ३७० हटवले, तरी इस्लामीकरण सुरुच आहे! अंकुर शर्मांची धक्कादायक माहिती )

…त्यामुळेच ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले

स्वतंत्र भारताची घोषणा करणारे ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी 1956 साली भारत दौरा केला. त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते तर काही खाजगी कारणासाठी भारतात आले होते. तेव्हा ते दोन दिवस पश्चिम बंगालमधील कलकत्ता गेस्ट हाऊस इथे असताना बंगालचे तत्कालीन राज्यपाल पी बी चक्रवर्ती आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. गांधींची चले जाओ चळवळ शांत झाली होती आणि भारत सोडण्यासाठी कोणतीही परिस्थिती नसताना ब्रिचीशांना भारत सोडणे का भाग पडले असा प्रश्न चक्रवर्ती यांनी विचारला.

तेव्हा हसून अॅटली म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात गांधींची भूमिका फारच लहान होती. दुस-या महायुद्धानंतर ब्रिटीशांचे कंबरडे मोडले होते. त्याचवेळी आझाद हिंद सेनेकडून स्वतंत्र भारतासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. त्यामुळे भारतीय सैनिकांचा हा विद्रोह ब्रिटीशांना परवडणारा नव्हता. त्यामुळे ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले.

शाहीन बाग बाबतही सरकारने स्पष्टीकरण करावे

सीएए आणि शाहीन बाग प्रकरणी प्रश्नाला उत्तर देताना माहुरकर म्हणाले की, सीएए समर्थनीयच आहे. काही देशांमध्ये मुस्लीमांना थारा दिला गेला आणि तेथे त्यांनी स्वतःची मते दामटवण्यास सुरुवात केली. हे पाहाता सीएए योग्यच असल्याचे दिसते. शाहीन बागमधील आंदोलन म्हणजे कटकारस्थानच होते. सरकारला बदनाम करण्यासाठी केलेले हे कारस्थान होते. त्याद्वारे अल्पसंख्याकांना कशी वागणूक मिळते, हे बनावटपणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होता. सीएएबद्दल सरकारने स्पष्टीकरण केलेही आहे. शाहीनबागबद्दलही खरे म्हणजे करायला हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः फुटीरतेची बीजे रुजवणारी मदरसे बंद करावीत! कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड मत )

समान नागरी कायदा आवश्यक

समान नागरी कायदा आवश्यक आहे, हे सांगताना मसुरकर म्हणाले की, तिहेरी तलाकबाबत घेतलेला निर्णय ही समान नागरी कायद्याचीच एक सुरुवात आहे. तलाकसारखे कायदे अन्य मुस्लीम देशातही नाहीत. ते आपल्या देशात मुस्लीम अनुनय करणाऱ्या सरकारने राबवले याचे आश्चर्य वाटते.

या व्याख्यानाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविक केले. तसेच स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी आणि श्रोत्यांनी प्रश्न विचारुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.