इजिप्तमधील कैरो येथे २८ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पार पडलेल्या नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुचिता विनेरकर आणि तिच्यासोबत निवेथा आणि इशा सिंग यांनी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
रुचिता विनेरकर ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर रायफल क्लबची सदस्य असून, तिच्या या कामगिरीमुळे सावरकर स्मारकाच्या रायफल क्लबची कामगिरी आता अधिक उंचावली आहे. त्यामुळेच रविवार 6 मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबच्या वतीने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे रुचिताचा सन्मान करण्यात आला.
(हेही वाचाः सावरकरांनी सांगितलेला हिंदू धर्म हाच खरा माणूसधर्म)
रुचिताची उल्लेखनीय कामगिरी
कैरो येथे होणा-या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सांघिक एअर पिस्तूल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व रुचिता, निवेथा आणि इशा या त्रिकूटाने केले. त्यांच्या कामगिरीमुळे भारताने जर्मनीवर मात करत सुवर्णपदक आपल्याकडे खेचून आणले. 16 अचूक लक्ष्यवेध करत या त्रिकूटाने मोठी कामगिरी केली. यामध्ये रुचिताने उल्लेखनीय कामगिरी करत शेवटच्या क्षणी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
सावरकर क्लबकडून सन्मान
रुचिताच्या या कामगिरीमुळे सावरकर रायफल क्लबची मान उंचावली असल्याचे क्लबचे मुख्य प्रशिक्षक विश्वजीत शिंदे यांनी सांगितले. सावरकर रायफल क्लबसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असल्याने रुचिताचा सन्मान करण्याची पहिली संधी आम्हाला मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे देखील त्यांनी सांगितले. सावरकर स्मारकातर्फे बॉक्सिंग, आर्चरी, रायफल शूटिंग यांसारखे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. सावरकर रायफल क्लबच्या सदस्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदकं पटकावली आहेत. प्रत्येकासाठी रुचिताने आपला एक आदर्श निर्माण केला आहे, असे विश्वजीत शिंदे यांनी सांगितले.
(हेही वाचाः बाळासाहेबांचा ‘हा’ नारा आता ऐकू येणार नाही! शरद पोंक्षेंना वाटते भीती)
सावरकरांचे बलशाली भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकारणार- स्वप्नील सावरकर
बलशाली भारत निर्माण करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न डोळ्यांसमोर ठेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि इतर पदाधिकारी चालत आहेत. त्यामुळे सावरकर रायफल क्लबमधून जास्तीत-जास्त रुचिता निर्माण व्हाव्यात हे लक्ष्य प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्नील सावरकर यांनी सांगितले. रुचिताचा आम्हाला अभिमान असून तिने ऑलिम्पिकचं पदक मिळवून देशाचं आणि सावरकर रायफल क्लबचं नाव जगभरात मोठं करावं, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर, कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इलवे, क्रीडा वृत्तनिवेदक विजय साळवी उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षवेध शूटिंग स्पर्धेतील विजेत्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
Join Our WhatsApp Community