वीर सावरकर हे या देशाला लाभलेले दूरदृष्टीचे क्रांतिकारक होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक भेटीला मी एक तीर्थयात्रा मानतो, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. रविवारी, २१ मे २०२३ रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल बैस पुढे म्हणाले, या पुरस्कार सोहळ्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक भेटीला मी एक तीर्थयात्रा मानतो. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मेजर कौस्तुभ राणे यांना मी भावपूर्ण अभिवादन करतो. त्याशिवाय विज्ञान पुरस्कार विजेते प्रा. अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार विजेते मैत्री परिवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार विजेते प्रदीप परुळेकर यांचे अभिनंदन करतो.
वीर सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक होते. दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते जगातील एकमेव क्रांतिकारक होत. सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य…हे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी यांनी सावरकरांचे केलेले सुंदर वर्णन इतर कोणीही करू शकत नाही. दूरदृष्टीचे क्रांतिकारक होते. विधवा पुनर्विवाह, जाती निर्मूलन, अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
सावरकर पाठ्यपुस्तकात यायला हवेत
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शक आहे. त्यांच्या ने मजसी ने…, जयोस्तुते… यांसारख्या कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हव्यात, असे मत राज्यपाल बैस यांनी मांडले. दुर्भाग्याने आपल्या देशात अशीही वेळ येऊन गेली की, अनेक क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. त्यांच्याविषयी नकारात्मक भावना पसरवण्यात आली, त्यांना बदनाम करण्यात आले. आता वेळ आली आहे की या ऐतिहासिक अन्यायाला वाचा फोडावी आणि स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारकांना योग्य गौरव बहाल केला जावा. तुम्ही जर सावरकरांचे कार्य नाकारत असाल, तर देशातील क्रांतीकारकांचे, जवानांचे बलिदान नाकारत आहात. देशावर प्रेम करणारा कोणताही नागरिक हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राज्यपालांनी तत्कालीन कॉंग्रेसप्रणित सरकारला नाव न घेता राज्यपाल बैस यांनी खडेबोल सुनावले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या पुरस्कारांमागील संकल्पना विशद केली. स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
कुणाला दिले पुरस्कार?
स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार २०२३ हा पुरस्कार मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (मरणोत्तर) यांना प्रदान करण्यात आला. मेजर कौस्तुभ राणे यांच्या वडील प्रकाश राणे आणि आई ज्योती राणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२३ हा आय.आय.टी. कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांना देण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार २०२३ हा पुरस्कार नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला घोषित देण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे प्रतिनिधी प्रा. प्रमोद पेंडके आणि प्राचार्य माधुरी यावलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारा व्यक्ती वा संस्था यांना देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार २०२३ हा रत्नागिरी येथील अधिवक्ता (वकील) प्रदीप (बाबा) चंद्रकांत परुळेकर यांना देण्यात आला.