धर्म घराबाहेर येणं योग्य आहे का? काय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत

धर्मिक कर्मकांडाचा पगडा कमी होणार नाही तोपर्यंत बुद्धीचा वापर केला जाणार नाही.

135

गेले काही दिवस देशात हिजाब प्रकरणावरुन वातावरण पेटले आहे. ज्याठिकाणी शिक्षण हा एकमेव धर्म पाळला जायला हवा, त्या शिक्षण संस्थांमध्ये जातीय धर्माचा शिरकाव करण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. यावरुन अनेक वाद-प्रतिवाद होत आहेत. पण धर्म हा आपल्या घराची सीमा ओलांडतो तेव्हा त्याचे होणारे दुष्परिणाम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजाला पटवून दिले आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा शनिवार 26 फेब्रुवारी रोजी 56वा आत्मार्पण दिन आहे. एक प्रखर राष्ट्रभक्त म्हणून सावरकरांची संपूर्ण जगात ओळख आहे. पण त्यासोबतच समाजसुधारणेसाठी देखील सावरकरांनी फार मोठे कार्य केले आहे. धर्म आणि धर्मग्रंथ याबाबत सावरकरांनी कायमंच आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे विचार हे आजही आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.

(हेही वाचाः स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांचे सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन)

धर्मग्रंथ सुधारणेचे कट्टर शत्रू बनू शकतात

धर्म हा आपल्या घरात ठेवा, असे म्हणणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माचं स्तोम माजवणा-यांच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले आहे. आपल्या विज्ञाननिष्ठ निबंधांमध्ये त्यांनी धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी विज्ञानाचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे. धर्मग्रंथ जेव्हा प्रथम रचले जातात तेव्हा ते बहुधा कोणती तरी एक सुधारणा घडवून आणण्यासाठीच रचलेले असले तरी ते लवकरच भावी सुधारणेचे कट्टर शत्रू बनतात, असे सावरकरांनी म्हटले आहे.

तर कोणत्याच धर्मियांची प्रगती होणार नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला असला तरी कुठल्याच धर्माचे अवडंबर त्यांना मान्य नव्हते. धर्म हा प्रत्येकाने घरात पाळावा, तो रस्त्यावर आणू नये हे सांगतानाच मुस्लिम आणि ख्रिश्चन आपल्या धर्माचा आग्रह सोडणार असतील, तर मी सुद्धा हिंदुत्वाचा आग्रह धरणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. धर्मिक कर्मकांडाचा पगडा कमी होणार नाही तोपर्यंत बुद्धीचा वापर केला जाणार नाही. आणि त्यामुळे कोणत्याच धर्मियांची प्रगती होणार नाही.

(हेही वाचाः तरुणांनी वीर सावरकरांचे विचार आचरणात आणावे! अविनाश धर्माधिकारी यांचे आवाहन)

तो अधिकार समाजाचा, धर्मग्रंथांचा नाही

ज्या रुढींना, परंपरांना शास्त्राचा आणि विज्ञानाचा आधार नाही त्या सर्व रुढी, परंपरा मोडून काढल्या पाहिजेत. आज काय योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे, धर्मग्रंथांचा नाही, असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. शाळा हे विद्येचं घर आहे. त्यामुळे तिथे आपल्या घरातील धर्म आणणं हे योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या या मताचा आधार हा नक्कीच देता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.