शौर्याचं शेवटचं टोक होते वीर सावरकर!

279

जिवंत असतांना एखाद्या माणसाला प्रेताच्या तिरडीवर चढवलं तर काय वाटेल हो त्याला? सावरकरांना अंदमानला नेत होते तेंव्हा नेमकी हीच भावना होती त्यांच्या मनात! जन्मठेपेची कहाणी सांगतांना सावरकर लिहितात, ‘‘आम्ही कैदी कलकत्याहून निघालो, तेंव्हा अनेकजण निरोप देत होते आम्हाला कायमचा. आम्ही परतून येणार नाहीच याची खात्री होती त्यांना. पण मला मात्र काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटत होती, मृत्यूची भीती नव्हती मनात, पण मी जो यज्ञ मांडलाय स्वातंत्र्याचा, तो माझ्या अनुपस्थितीत ‘आम्ही’ पुढे चालवू असं या आलेल्या बघ्यांपैकी कुणीच का मला पुढे येऊन सांगत नाही? याची खंत होती. एक जण जरी पुढे आला असता, आणि म्हणाला असता की, जा बंधो जा, तू नसलास तरी तुझा हा स्वातंत्र्ययज्ञ आम्ही असाच धगधगत ठेवू.’ हे ऐकून मला अंदमानात जातांना आपण जिवंतपणी कुण्या तिरडीवर चढवले जात आहोत असं नसतं वाटलं, त्या माणसांच्या आश्वासनाने ती तिरडी राहिली नसती, ती माझ्यासाठी फुलांची शेज झाली असती.’’

( हेही वाचा : जलपूजनाला झाली ६ वर्षे; शिवस्मारक अजून कागदावरच)

अंदमानात जीवनाची शाश्वती नव्हती, सावरकर आलेल्या प्रत्येक संकटाला संधी मानत होते, स्वतःला अजमावण्याची! कलकत्ता ते अंदमान प्रवासात सगळे कैदी ज्या भांड्यात संडास करतात त्याच्या बाजूला सावरकरांना बसवलं, अतिशय घाणेरडा दर्प त्यांच्या नाकात गेला, पण या माणसाने विचार केला, हीच आपली संधी, अद्वैत वेदांताच्या साधनेची, पराकोटीचे मनस्ताप भोगून अध्यात्माची सर्वोच्च पातळी गाठण्याची!

तेलाच्या घाण्याला जुंपलेले असत सावरकर, आठ-आठ तास तो कोलू फिरवला तरी जेमतेम दोन-चार पौंड तेल निघे. बारी जेलर येऊन त्यांच्यावर हसे, म्हणत असे, ‘तो कैदी पहा, तो तर इतकं तेल गाळू शकतो, तुम्हाला तेवढही जमू नये’? सावरकर बारीला जवाब द्यायचे- ‘मी अर्ध्या तासात प्रतिभासंपन्न कविता करून देतो? त्या कैद्याला चार ओळी लिहिणे तरी जमेल’? सावरकरांच्या या बाणेदारपणाचा बारीला हेवा वाटायचा.

सावरकरांच्या कोठडीसमोर फाशीघर. तीन जणांना फासावर चढवलं जात असे, एकाच वेळी. त्यातले काही असत अट्टल गुन्हेगार. त्यांना ओढत, फरफटत आणावं लागे आणि आवळावे लागत त्यांच्या गळ्याभोवती फास. त्यांच्या त्या किंकाळ्यांनी सेल्युलर थरारून जात असे. त्यांची प्रेतं तशीच पडून राहत तासंतास सावरकरांच्या कोठडीसमोर. जास्तीत जास्त मानसिक खच्चिकरण करावं सावरकरांचं यासाठी हा खटाटोप. हे असे मृत्यू आपल्या समोर होतांना बघून काय यातना होत असतील? प्राण पुन्हा पुन्हा तळमळत नसतील का? तरीही सावरकरांचं वेगळेपण बघा, आत्महत्या करायला निघालेल्या आपल्यासारख्या राजबंदीवनांना सावरकर सांगत, ‘स्वतःला संपवू नका, आज तुम्ही कष्ट सोसाल पण पुढे काही वर्षांनी याच कारागृहाबाहेर तुम्हाला आदरांजली म्हणून तुमचे पुतळे उभे राहातील, अंदमान हे क्रांतीचं राष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनेल’. सावरकरांचे शब्द खरे ठरले.

अंदमानात सावरकरांचं व्यक्तिमत्व हे एखाद्या लढाईला निघालेल्या सेनापातीसारखं होतं असं वाटतं. युद्धाला निघालेल्या प्रत्येक सैनिकाच्या भोवती मृत्यू घोंघावत असतोच, पण त्याला चकवून, भुलवून त्यावर मात करून स्वतः विजय मिळवणं यासाठी लागतं अपार धैर्य. कमालीची सहनशीलता असावी लागते अंगात. त्यांनी अंदमानात कोलू फिरवला, काथ्या कुटला, पाठीवर आसूड झेलले, हातापायात साखळदंड अडकवून दिवस दिवस टांगून ठेवत होते त्यांना भिंतीला, अन्नात साप, गोमांचे तुकडे निघत, अंघोळीला खारे पाणी फक्त तीन कटोरे मिळे, शौचाला रात्री जास्तीची झाली तर नव्हती जाण्याची सोय. काय आणि किती सांगू? सतत अंधार, सतत प्रतिकूलता सोबत होती त्यांच्या, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बाज इतका लढाऊ की हे सगळं सोसत सोसत या माणसाने लिहिल्या प्रतिभासंपन्न सहा हजार काव्यपंक्ती घायपात्याच्या काट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर, घेतले कैद्यांचे साक्षरता वर्ग, करून दिली जाणीव राजबंद्यांना त्यांच्या हक्कांची, दिली प्रेरणा अनेकांना जगण्याची !

टोकाची प्रतिकूलता असतांना जगाला अचंबित करेल अशी अनुकुलता स्वतः भोवती निर्माण करत होते सावरकर! अंदमानात त्याचं व्यक्तित्व होतं संकटांवर स्वार झालेल्या सैनिकाप्रमाणे झुंजार! त्यांच्या व्यक्तिमत्वातील या तेजामुळे कल्पनेपल्याडचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. सेल्युलर कारागृहात, मृत्युच्या साम्राज्यात जीवनप्रेरणेचे सडे शिंपले. हा माणूसच मुळात शूर होता, म्हणून आज त्याला आपण वीर म्हणून गौरवतो, स्वातंत्र्यवीर !

पार्थ बावस्कर ( लेखक व्याख्याते व इतिहास अभ्यासक आहेत )
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.