एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणीने २ वर्षाच्या मुलाला चुकीचे इंजेक्शन टोचल्यामुळे मुलाचा काही मिनिटातच मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोवंडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सफाई कर्मचारी तरुणीसह चार जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
तहा आजम खान (२वर्षे) असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे. १२ जानेवारी रोजी तहा याला उलटी जुलाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे आई-वडिलांच्या त्याला शिवाजी नगर बैगणवाडी या ठिकाणी असलेल्या नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. १३ जानेवारी रोजी तहा याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा होती, दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुट्टी देखील देण्यात येणार होती. त्याच रुग्णालयात एक १६ वर्षाचा रुग्ण दाखल होता, डॉक्टरांनी या रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी निवासी डॉक्टरकडे लिहून दिले होते. दरम्यान निवासी डॉक्टरांनी ऑन ड्युटी नर्सला इंजेक्शन देण्यास सांगितले.
बाळाचा मृत्यू
या नर्सने इंजेक्शन देण्यासाठी १७ वर्षांची सफाई कर्मचारी तरुणीला सांगितले. मात्र इंजेक्शन कुणाला द्यायचे हे माहीत नसल्यामुळे सफाई कर्मचारी तरुणीने १६ वर्षांच्या रुग्णाला हे इंजेक्शन देण्याऐवजी इंजेक्शन २ वर्षांच्या तहा याला दिले. हे इंजेक्शन देताच दोनच मिनिटात तहा या बाळाने रुग्णालयातच दम तोडला. या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांना शांत करून त्यांची तक्रार दाखल करून रुग्णालयाचे संचालक, निवासी डॉक्टर, नर्स आणि १७ वर्षांची सफाई कर्मचारी या यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community