व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे!

141

ताडोबा हे वाघ बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले.

( हेही वाचा : रेल्वे मेगाब्लॉक असला तरी, नो टेन्शन! बिनधास्त फिरा कारण… )

पर्यावरणाचे रक्षण करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निमिर्तीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे, येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी जेणेकरून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल. वन अकादमीनजिक जे वन्यजीव रेस्क्यु सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झु ॲथॉरिटीची मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वैयक्तिक सोलर कुंपण

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पीकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरीत करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताडोबा भवन

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एकूण ६४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. चालू व येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी देले.

( हेही वाचा : मुलांचे पोषण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मध्यान्ह भोजनात ‘या’ धान्यांचा केला समावेश! )

राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचा क्षेत्र विस्तार करण्यास व हे क्षेत्र गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार असून या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर कारवा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे अशी माहिती ही बैठकीत देण्यात आली.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रातील बांबूला फुलोरा येण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात बांबू कुपांची कामे, जाळरेषेचा विस्तार, अतिरिक्त अग्नि संरक्षक मजूर लावणे, बिनतारी संदेशन यंत्रणेचे बळकटीकरण करणे, बांबू बिया गोळा करून सीड बॉल तयार करणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीही निधीची तरतूद करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.