वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने मुरबाडमधील मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती व्दारा संचलित, महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडमध्ये, २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यामधील विविध शाळांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड येथे मागील २५ वर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमिताने या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सन २००५ पासून, अधिवक्ता कै. अशोक इनामदार स्मृती चषक देऊन स्पर्धकांना गौरविण्यात येते. यापूर्वी तालुक्यातील विविध शाळांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळवली आहेत. या वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासह वक्तृत्व कलेस प्रोत्साहन देणे हा आहे. स्पर्धेसाठी गट ‘अ’ वर्ग ५ वी ते ७वी गट ‘ब’ वर्ग ८ वी ते ९ वीचे स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास प्रमाणपत्रासह पारितोषिके (सन्मान चिन्ह) आणि अधिवक्ता कै.अशोक इनामदार स्मृती चषक देवून गौरविण्यात येते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धासाठी प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिध्द निवेदक, उत्कृष्ट वक्ते, सावरकर भक्त, व सेवा निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रुपचंदजी झुंजारराव (अंबरनाथ) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित सर्व स्पर्धक विद्यार्थी आणि शिक्षकांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. आणि या स्पर्धा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. सद्यस्थितीत शाळेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी का वाचले आणि ऐकले पाहिजे याविषयी आपले विचार व्यक्त केले आणि स्पर्धेचे नियम व गुणांकन याविषयी माहिती दिली.

मागील काही वर्षांत या स्पर्धेसाठी अनेक नामवंत व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. माजी शिक्षक आमदार कै.प्र.अ. संत सर व वसंत पुरोहित यांनी या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे याची आठवण त्यांनी करून दिली. वीर सावरकरांविषयी अनेक पैलूंवर, अनेक विषयांवर विद्यार्थ्यांची दिमाखदार आणि माहितीपूर्ण भाषणे झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुपचंद झुंझारराव यांनी उपस्थितांना संबोधित केले. उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना रुपचंद झुंजारराव म्हणाले की, ही स्पर्धा एक मोठी उत्कृष्ट व्याख्यानमाला आहे असे वाटते. अशा स्पर्धाच्या आयोजनामुळे भावी काळात उत्कृष्ट वक्ते तयार होतील आणि सोबतच देशभक्तीची ज्वाला विद्यार्थ्यांच्या मनात तेवत राहील यात शंका नाही. विद्यार्थ्यांची भाषणे आणि त्यांचे वीर सावरकरांवर बोलण्याचे धाडस आणि विचार पाहून वीर सावरकर या शब्दाचाच अर्थ देशभक्ती आहे हे पटायला लागते. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल हे सावरकरांच्या विचार प्रसाराचे एक व्यासपीठ आहे. असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक होते. वीर सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती व देशाभिमान यांचा आदर्श या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. असे ही ते पुढे म्हणाले.

शाळेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या या हे प्रेरणादायी कार्याचा प्रसार आणि प्रचार मागील पंचविस वर्षापासून सातत्यपणाने केला जात आहे यासाठी शाळेच्या या कार्याचा विशेष उल्लेख करुन शाळेच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी वक्तृत्वस्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा)

या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. किशोरी भोईर आणि खंडू भोईर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रमोद देसले यांनी केले. रविवार सुट्टीचा दिवस असून सुद्धा अपेक्षेपेक्षाही जास्त स्पर्धेकांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला. आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. कार्यक्रमासाठी शाळांचे स्पर्धक विद्यार्थी आणि विद्यार्थींनी त्यांचे शिक्षक, पालक, शाळेचे सर्व विभागामधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here