मुंबईत दीड महिन्यांत ४५ लाख लसीकरणाचे लक्ष्य!

मुंबईमध्‍ये सध्‍या दररोज २५ हजार कोविड तपासण्‍या होत आहेत. कोविड-१९ संसर्ग वाढत असल्‍याचे पाहता ही संख्‍या टप्प्याटप्प्याने दुप्‍पट म्‍हणजे दररोज ५० हजार इतकी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले आहे.

101

मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्‍णालयांची संख्‍या सध्‍याच्‍या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही मंजुरी प्राप्‍त होताच सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये मिळून दररोज किमान १ लाख नागरिकांना लस देण्‍याचे नियोजन करण्‍यात येणार असून येत्या ४५ दिवसांमध्‍ये पात्र अशा ४५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन कोविड-१९ संसर्गाला वेळीच लगाम घालण्‍याचे प्रयत्‍न एकत्रितपणे करावयाचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

महापालिका, खासगी रुग्‍णालयांच्या आयुक्तांनी घेतली बैठक! 

मागील काही दिवसांमध्‍ये सर्वत्र कोविड-१९ रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा एकदा वाढू लागली आहे. यामुळे आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतही कोविड रुग्‍ण संख्‍येचा आलेख वाढू लागल्‍याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये खासगी रुग्‍णालयांचे देखील सहकार्य मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने, मुंबईतील विविध खासगी रुग्‍णालयांसह‍ महानगरपालिकेच्‍या सर्व रुग्‍णालयांची महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी दुपारी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. विशेषतः कोविड-१९ रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन तसेच लसीकरण या दोन्‍ही बाबींवर आयुक्‍तांनी निरनिराळ्या सूचना केल्‍या. या बैठकीला महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, संबंधित सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सहायक आयुक्‍त तसेच रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता व प्रमुख उपस्थित होते.

(हेही वाचा : विवाह, हळदी समारंभासह पबही ठरतात कोरोनाचे स्प्रेडर्स!)

लसीकरणाचे जास्‍तीत जास्‍त बूथ उभारण्याचे निर्देश

मुंबईमध्‍ये सद्यस्थितीत एकूण ५९ खासगी रुग्‍णालयांना कोविड-१९ लसीकरणासाठी निर्देशित करण्यात आले आहे. असे असले तरी या रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण अत्‍यल्‍प म्‍हणजे सर्व मिळून दररोज फक्‍त ४ हजार इतके आहे. यामुळे प्रत्‍येक खासगी रुग्‍णालयाने दररोज किमान १ हजार पात्र नागरिकांना लस देण्‍याचे उद्द‍िष्‍ट निश्चित करुन त्‍याप्रमाणे कार्यवाही केली पाहिजे, असेही निर्देश दिले आहेत. लस घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्‍यासाठी तसेच जवळच्‍या संबंधित खासगी रुग्‍णालयांमध्‍ये नागरिकांनी लसीकरणासाठी यावे, म्‍हणून खासगी रुग्‍णालयांनी रोटरी, लायन्‍स यांच्‍यासारख्‍या सामाजिक व सेवाभावी संस्‍थांची मदत घ्‍यावी. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी लसीकरणाचे जास्‍तीत जास्‍त बूथ करावेत. तसेच पुरेशी जागा, पिण्‍याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्‍यवस्‍था आदी बाबींची पूर्तता करावी. लसीकरणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, म्‍हणजे कोणालाही जास्‍त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी स्‍वतंत्र कक्ष करावेत. जेणेकरुन लवकर लस देता येईल. गर्दी होणार नाही.

दररोज ५० हजार कोविड तपासण्‍या करण्याचे ध्येय

मुंबईमध्‍ये सध्‍या दररोज २५ हजार कोविड तपासण्‍या होत आहेत. कोविड-१९ संसर्ग वाढत असल्‍याचे पाहता ही संख्‍या टप्प्याटप्प्याने दुप्‍पट म्‍हणजे दररोज ५० हजार इतकी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले आहे. अधिकाधिक रुग्‍ण शोधण्‍यासाठी ही मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. स्‍वाभाविकच रुग्‍ण संख्‍येमध्‍ये वाढ दिसून येत आहे. या रुग्‍णांमध्‍ये लक्षणे नसलेल्‍या बाधितांचे प्रमाण लक्षणीय आहे. असे असले तरी, आरोग्‍य यंत्रणेसह सर्वांनी रुग्‍ण संख्‍येतील वाढ लक्षात घेता युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्‍यात, असे सांगून आयुक्‍तांनी पुढीलप्रमाणे सूचना केल्‍या. महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये देखील ही क्षमता वाढविण्‍यात येत आहे. त्‍याच धर्तीवर खासगी रुग्‍णालयांनी देखील पुन्‍हा एकदा कोविड रुग्‍णशय्यांची संख्‍या वाढवावी. येत्‍या ४८ तासांमध्‍ये ही पूर्ण व्‍यवस्‍था उपलब्‍ध करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्‍णशय्यांमध्‍ये ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडची संख्‍या पुरेशी राहील, याकडे लक्ष द्यावे. त्‍यासाठी साधनसामुग्री, पुरक मनुष्‍यबळ आदी सर्व व्‍यवस्‍था युद्ध पातळीवर करावयाची आहे. तसेच ही सर्व कार्यवाही पूर्ण केल्‍याची माहिती रुग्‍णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच लागलीच महानगरपालिकेला कळवावी, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.