भारत येत्या दोन वर्षात क्षयरोग मुक्त असावा, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहे. आरोग्य विभागाने क्षयरोग मुक्त पंचायत मोहिम हाती घेतली आहे. आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांच्या उपस्थितीत रायगड येथून नुकतीच क्षयरोग मुक्त पंचायत मोहिमेला सुरुवात झाली. कोविड-19 साथीच्या रोगाचा भारतातील क्षयरोग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो, असा अहवाल खासगी संस्थांनी सादर केला असताना क्षयरोग मुक्त पंचायत मोहिमेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये राज्य आरोग्य विभागाने क्षयमुक्त पंचायत मोहिमेला शनिवारपासून सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या आरोग्य क्षेत्रातील या महत्वकांक्षी योजनेत देशभरातील एक हजार पंचायतींना क्षयरोगमुक्त केले जाणार आहे. राज्यात राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी रायगड जिल्हा राज्य आरोग्य विभागाने निवडला. रायगड जिल्ह्यातील दहा गावांमधील दहा हजार नागरिकांची क्षयरोग तपासणी या प्रकल्पांतर्गत राज्य आरोग्य विभागाचे अधिकारी करतील. जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने राज्य आरोग्य विभागाचे अधिकारी रुग्णांची ओळख, निदान, उपचार करतील.
यावेळी राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत माय लॅबचे हँडी एक्स-रे मशीन आणि खोकल्याच्या आवाजावरून क्षयरोगाचे निदान करणाऱ्या एप्लीकेशनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. बैठकीला ठाणे, रायगड,पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा क्षयरोग अधिकारीही उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील मोहिमेच्या यशानंतर हळूहळू राज्यातील इतर भागातही क्षयरोगमुक्त पंचायत अभियानाची सुरुवात होईल. या मोहिमेकरिता द युनियन साउथ ईस्ट आशियाकडून सहाय्य आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडून आर्थिक मदत मिळणार आहे.
(हेही वाचा – J.J Hospital : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला जेजे रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी बांधकामाचा आढावा)
जगात टीबीचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. ‘इंडिया टीबी रिपोर्ट’ (केंद्रीय टीबी विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारे प्रकाशित) नुसार 2019 मध्ये सुमारे 2.64 दशलक्ष भारतीयांना क्षयरोग झाला होता, त्यात अंदाजे 4लाख 50 हजार रुग्णांचा मृत्यू झाला होता. भारतीय राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे 2025 पर्यंत राष्ट्राला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात भारताच्या क्षयरोग (टीबी) नियंत्रण कार्यक्रमावर कोविड-19 साथीच्या प्रतिबंधांच्या संभाव्य प्रतिकूल परिणामांचे परीक्षण केले आहे.कोविड-19 साथीच्या रोगामुळे समाजातील गरीब वर्गातील लोकांना त्रास झाला. क्षयरोग सारख्या घातक आजाराचा सामना करणा-या रुग्णांच्या परिस्थितीबाबत अद्यापही देशपातळीवर सरकारी केंद्रांकडून अभ्यास झालेला नाही.
दिल्ली येथील द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडियाच्या संशोधकांनी केलेल्या सर्व्हेक्षणाबाबत रुग्णांना सार्वजनिक आरोग्य सुविधांमधून क्षयरोगाची औषधे गोळा करण्यात अडचणी आल्या, 4-7% रुग्णांना देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान त्यांची औषधे बंद करण्यास भाग पाडले गेले. परिणामी, येत्या काळात क्षयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली.