पावसाच्या मा-याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातल्याने कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात राज्यातील जनता गारठली आहे. गेल्या चार दिवसांपासून साता-यातील घाट परिसरात पावसाचे थैमान सुरू आहे. परिणामी, बुधवारी सायंकाळी महाबळेश्वर येथील कमाल तापमान चक्क १८.७ अंश सेल्सिअसवर उतरले असून, राज्यात सर्वात कमी कमाल तापमानाचा विक्रम महाबळेश्वर येथे झाला. विशेष म्हणजे बुधवारी सकाळी महाबळेश्वरमधील किमान तापमान १७.३ अंश सेल्सिअसवर होते.
तापमानात मोठी घसरण
संपूर्ण राज्यातील किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात असताना गेल्या दोन दिवसांपासून घाट परिसरात गारठ्याचाही अनुभव येत होता. दिवसभराच्या पावसाच्या संततधारांनी कमाल तापमानातही घसरण होऊ लागली होती. राज्यात विविध भागांत गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ३ ते ९ अंशापर्यंत कमाल तापमान खाली उतरले. परिणामी कमाल आणि किमान तापमानात दोन ते चार अंशांचाच फरक दिसून येत होता.
या भागांतील तापमान जास्त
विदर्भात ब्रह्मपुरीतील कमाल तापमान बुधवारी राज्यभरात जास्त नोंदवले गेले. ब्रह्मपुरीत २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीतील कमाल तापमान गेल्या दहा वर्षांतील सरासरीच्या तुलनेत २.९ अंश सेल्सिअसने कमी होते. विदर्भातील कमाल तापमान २३ ते २८ अंशादरम्यान, मराठवाड्यात २३ ते ३४, मध्य महाराष्ट्रात १८ ते २४ तर कोकणात २६ ते २७ अंशादरम्यान कमाल तापमान खाली उतरले.
- राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्रपुरी येथे २८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले
- राज्यात सर्वात कमी कमाल तापमान महाबळेश्वर येथे १८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले
- राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले
- राज्यात सर्वात जास्त किमान तापमान कुलाब्यात २६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.