डिसेंबरच्या तिस-या आठवड्यात उत्तर भारतातील बहुतांश भागांत थंडीमुळे काकडआरती सुरु झाली आहे. शनिवारी राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड तसेच मध्यप्रदेशापर्यंत आज थंडीची लाट दिसून आली. ही थंडी अजूनच गारठवणारी ठरतेय. ईशान्येकडील राज्यात १० ते १५ किलोमीटरपर्यंत ईशान्य दिशेने जोरदार वारे वाहत आहेत. हा प्रभाव मंगळवार, २१ डिसेंबरपर्यंत राहील. या प्रभावामुळे महाराष्ट्रात सोमवारपर्यत दोन ते तीन अंशाने तापमान खाली सरकेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर
महाराष्ट्रातील बहुतांश भागांतील किमान तापमान आता १२ ते १८ अंशाच्या आसपास पोहोचले आहे. कोकणात गेल्या काही दिवसांत किमान तापमानातील घट चांगलीच जाणवत आहे. सरासरीच्या तुलनेत कोकणातील किमान तापमानाची घट अजूनच खाली गेल्याची नोंद होत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून दिली गेली. यंदाच्या दिवसांत विदर्भाखालोखाल मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान ब-यापैकी खाली सरकते. पुणे, सातारा, महाबळेश्वरला किमान तापमान १० अंशापर्यंत नोंदवले जाते. सध्या या भागांतील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशाने जास्त आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचा जोर दिसून येत आहे.
धूरक्यांचा प्रभाव
घटत्या तापमानाच्या प्रभावामुळे किनारपट्टीसह मुंबई आणि लगतच्या परिसरात धुरक्यांची चादर ओढली गेली असल्याने वीकेण्डला मुंबईबाहेर पिकनिकला जाणा-यांची चांगलीच मजा सुरु आहे. अगदी पुणे, साता-यापर्यंत धुरक्यांची चादर दिसून येत आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर येथे ११.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी देशभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली पहिली तीन ठिकाणे
- चारु (-१.१ अंश सेल्सिअस)
- अमृतसर (०.७ अंश सेल्सिअस)
- गंगानगर (१.१ अंश सेल्सिअस)