दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण!

117

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

ही सवलत केवळ 2021-22 च्या परीक्षेकरिताच

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – कोविड काळातील खर्चाचा ‘कॅग’ने हिशेब करावा : भाजप गटनेत्याची मागणी)

असा असेल परीक्षेचा कालावधी

प्रचलित पद्धतीनुसार बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व दहावीची परीक्षा एक मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.  बारावीची लेखी परीक्षा चार मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.