जान मोहम्मदवर २० वर्षांपूर्वी दाखल झाला होता गुन्हा… काय म्हणाले एटीएस प्रमुख?

या गुन्ह्याची सध्याची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला जात आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारा जान मोहम्मद उर्फ समीर कालिया शेख याच्यावर २० वर्षांपूर्वी पायधुनी पोलिस ठाण्यात गोळीबार आणि तोडफोडी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो आमच्या रडार होता, तत्पूर्वी केंद्रीय यंत्रणेला या दहशतवाद्याची कुणकुण लागली होती व त्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर त्यांनी जान मोहम्मदला दिल्ली येथे जात असताना कोटा येथे अटक केली. अशी माहिती राज्याचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी बुधवारी नागपाडा येथे एटीएस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

(हेही वाचाः जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?)

कोण आहे जान मोहम्मद?

जान मोहम्मद उर्फ समीर कालिया शेख हा आर्थिकदृष्ट्या खूप खचला होता. त्याच्या डोक्यावर डोंगराएवढे कर्ज झाले होते. मुंबईत टॅक्सी चालवणाऱ्या जान मोहम्मदने बँकेचे हप्ते भरले नसल्यामुळे बँकेने टॅक्सी देखील नेली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. जान मोहम्मद उर्फ समीर कालिया याच्यावर मुंबईच्या पायधुणीत २० वर्षांपूर्वी गोळीबार आणि तोडफोड केल्याचे गुन्हे दाखल असून, या गुन्ह्याची सध्याची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला जात आहे.

(हेही वाचाः दहशतवाद्यांचा कट : मुंबई रेल्वे स्थानकांची केलेली रेकी! गृहमंत्र्यांची उच्च स्तरीय बैठक)

कोणी काढले तिकीट? 

जान मोहम्मदला रेल्वेचे तिकीट काढून देणारा एजंटला एटीएसने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. जान मोहम्मदला ९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जायचे होते. त्यासाठी मी त्याला गोल्डन टेम्पल या गाडीचे तिकीट काढून दिले. मात्र हे तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे, १३ सप्टेंबर रोजी निजामुद्दीन एक्स्प्रेसचे दुसरे तिकीट त्याला काढून दिले होते, अशी माहिती या एजन्टने एटीएसला दिली आहे. जान मोहम्मदच्या पत्नीकडे चौकशी करण्यात आली असून तिचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचाः दहशतवादी जान महंमदचे कुटुंबीय ताब्यात! रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी )

एकत्र काम करू

जान मोहम्मदवर २० वर्षांपूर्वी असलेल्या गुन्ह्याचा आताच्या गुन्ह्याशी काहीही संबध नसून, त्याने मुंबईत कुठल्याही प्रकरणाची रेकी केलेली नसल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिस जे करू शकले नाही ते आम्ही करू असे नाही. आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात जी काही माहिती मिळाली ती दिल्ली पोलिसांशी समन्वय साधून, त्याच्यावर एकत्र काम करू. तसेच ती माहिती माध्यमांना देता येणार नसल्याचे अग्रवाल यांनी म्हटले.

काय आहे अंडरवर्ल्ड कनेक्शन?

जान मोहम्मद हा एक प्यादा असून त्याने केवळ पैशांसाठी हे काम केले असावे. त्याच्या संपर्कात दाऊद टोळीतील मुंबईतील एक मोठी व्यक्ती असण्याची शक्यता असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तसेच जान मोहम्मदला आर्थिक रसद देखील मुंबईतूनच पुरवली जात असावी, याचा देखील उच्च पातळीवर तपास सुरू आहे. मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या संपर्कात असणा-या अनेक बड्या व्यक्ती आहेत. या व्यक्तींवर एटीएस आणि गुन्हे शाखेने लक्ष केंद्रित केले आहे. अनिस इब्राहिम यांच्या संपर्कात असणारी व्यक्ती जान मोहम्मदच्या संपर्कात असण्याची शक्यता एटीएस सूत्रांनी वर्तवली आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्र एटीएस झोपलंय का? शेलारांचा सवाल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here