टीईटी परीक्षा प्रकरणी राज्यात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून धाड टाकण्याचं सत्र सुरूच आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असून पुणे पोलिसांनी त्याच्या घरातून तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक रकमेचा ऐवज जप्त केला आहे.
अश्विन कुमारला बंगळूरमधून अटक
पुणे पोलिसांच्या वतीनं तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. सुपेचे आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त करून पुणे पोलिसांचा धडाका आजही सुरुच आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
सुपेंकडे आणखी 58 लाखांचं सापडलं घबाड
तुकाराम सुपेच्या परिचिताकडून परवा रात्री २५ लाख रुपये पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी जप्त केले आहे. त्यानंतर त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना २४ तासात तुकाराम सुपेकडून ५८ लाख रुपये जप्त केले असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी १ कोटी ५८ लाख आणि ९० लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.