कन्फ्युजन ही कन्फ्युजन है…सोल्यूशन का पता नही!

तीन पक्षांचे सरकार असताना तारेवरची कसरत करावी लागते, हे जनता समजू शकते, मात्र तीन पक्षांचे नेते वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया देत आहेत हे पाहून हे सरकार कन्फूज आहे का, असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.

98

कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्यूशन का पता नही… अभिनेता आमिर खान याच्या ‘थ्री इडियट्स’ सिनेमाचे हे गाणे… जसा हा चित्रपट गाजला, तसेच हे गाणे देखील तितकेच हिट झाले. सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट असताना हेच गाणे नेमके का सुचले, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असावा. पण हे गाणे सुचण्यामागेही कारण तसेच आहे. राज्यात कोरोनाने कहर केला आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. नुसते रुग्णच वाढत नाही, तर मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. मात्र राज्यात हे चित्र असताना सरकार मात्र संभ्रमावस्थेत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लॉकडाऊनबाबत होता संभ्रम!

सरकार आधी जे निर्णय जाहीर करत आहे, त्यात कोणतीही स्पष्टता नसल्याने सर्वसामान्य संभ्रमात पडले आहेत. तीन पक्षांचे सरकार असताना तारेवरची कसरत करावी लागते, हे जनता समजू शकते. मात्र तीन पक्षांचे नेते वेगवेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया देत आहेत हे पाहून हे सरकार गोंधळात पडले आहे का, असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे. सुरुवात करायची झाली तर ज्यावेळी राज्यात कोरोना रुग्ण वाढत होते आणि मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याचा विचार करत होते, तेव्हा राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. खुद्द शरद पवार यांचाच लॉकडाऊनला विरोध असल्याचे, काही वृत्त वाहिन्यांमध्ये सांगण्यात आले होते. त्याचमुळे कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनात असूनही सुरुवातीला विकेंड लॉकडाऊन केला. तरी देखील राज्यातील आकडे आणि लोकांची कमी न होणारी गर्दी यामुळे मुख्यमंत्र्यांनी नंतर कठोर निर्बंध लावले. यानंतर मात्र लॉकडाऊन हा एकमेव पर्याय उरला असल्याचे सर्व मंत्र्यांना अचानक वाटू लागले आणि कॅबिनेटच्या बैठकीत थेट मुख्यमंत्र्यांना आता लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल, असे सांगितले. एवढेच नाही तर काही मंत्र्यांनी माध्यमांना बाहेर येऊन प्रतिक्रिया दिल्या की राज्यात कडक लॉकडाऊन लावला जाईल आणि मुख्यमंत्री याची घोषणा करतील. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: घोषणा न करता, थेट मुख्य सचिवांनी नवीन नियमावली पाठवत राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला. खरेतर एरव्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर फेसबूक लाइव्ह करायला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना इतका मोठा कडक निर्णय घेत आहोत हे सांगण्यासाठी समोर यावेसे वाटले नाही, हे सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणावे लागेल.

(हेही वाचा : कोरोनासारख्या आपत्तीवर ठाकरे सरकार निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडेंना साद घालणार का? )

रेमडेसिवीरनेही घातला गोंधळ!

राज्य सरकार संभ्रमात असल्याचे दुसरे उदाहरण द्यायचे झाले, तर नुकतेच रेमडेसिवीरचे गाजलेले प्रकरण देता येईल. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू झाली. या लढाईचा एक भाग पार्ले येथील पोलिस स्टेशनमध्ये रंगला. ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलिस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांना कारवाईबद्दल जाब विचारत त्यांची खरडपट्टी काढली. शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलिस अधिकारी बीकेसीतील पोलिस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलिस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी यात उडी टाकत भाजपवर निशाणा साधला, तेव्हा या प्रकरणातील खरा वाद रंगला. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या नेत्यांवर एकावर एक आरोप केले. मात्र याच वेळी खरा ट्विस्ट आला तो अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे. राजेंद्र शिंगणे यांच्या त्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारलाच घरचा आहेर मिळाला की काय, असे चित्र राज्यात निर्माण झाले. भाजपकडून राज्य सरकारसाठी रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याबद्दलची कल्पना मला होती. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि भाजपचे नेतेमंडळी यांची माझ्याच घरी बैठक झाली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करुन देण्यास तयारी दाखवली होती आणि मी त्या गोष्टीवर सहमती दर्शवली होती, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यानंतर नेमकं खरं कोण, सरकार की विरोधक आणि विरोधक खोटे असतील तर मग शिंगणेंचे ते वक्तव्य काय म्हणावे, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र शिंगणे यांच्या या वक्तव्यानंतर बॅकफूटला गेलेले विरोधक पुन्हा फ्रंट फूटवर आले आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरले. हे प्रकरण आपल्याच अंगावर येत असल्याचे लक्षात येताच शिंगणे यांनी घूमजाव केला. भाजप रेमडेसिवीर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलट-सुलट चर्चा समाज माध्यमांवर सुरू असून, ते सपशेल चुकीचे आहे. कुठल्याही पक्षाला रेमडेसिवीर वैयक्तिकरित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही, ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील, असे वक्तव्य करत शिंगणे यांनी आपली पडती बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

अभिमन्यू काळेंच्या बदलीवरुनही मतप्रवाह

एकीकडे ठाकरे सरकारमध्ये बऱ्याच मुद्द्यांवरुन संभ्रम असताना रेमडेसिवीरचे प्रकरण चिघळू नये, यासाठी थेट अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या अचानक बदलीवरुन देखील काँग्रेस नाराज असून, राष्ट्रावादी काँग्रेसच्या दबावामुळे ही बदली करण्यात आल्याचे काँग्रेसच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे. एकूणच काय तीन चाकी सरकारचे ‘थ्री इडियट्स’ तर झाले नाही ना? असा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना पडला तर वावगे वाटायला नको.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.