डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याने ठाण्याचा जीव गुदमरतोय

101

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या ठाणे खाडी भागाला नजीकच्या डम्पिंग ग्राऊंडमधील कच-याचा फटका बसल्याचा पुरावा वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेने सादर केला आहे. देवनार, कांजूमार्ग आणि ठाण्यातील कोपरी येथील डम्पिगं ग्राऊंडला लागूनच वाहणा-या ठाणे खाडीतील जलप्रदूषणामुळे ऑक्सिजन ब-याच प्रमाणात घटला आहे. त्यामुळे रामसर क्षेत्र म्हणून केंद्राकडे प्रस्तावित प्रकल्पाला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : स्मार्ट फोनवरून काही मिनिटात करा आधार कार्ड अपडेट )

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत रामसर क्षेत्रासाठी ठाणे खाडी परिसराला मान्यता दिली होती. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा देण्याचा वनविभागाच्या कादंळवन कक्षाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केला होता. हा प्रस्ताव आता केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. याच ठाणे खाडी परिसरात १ मे २०१७ रोजी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पाच वर्षांपूर्वी फ्लेमिंगो अभयारण्याचे उद्घाटन झाले होते. मात्र ठाणे खाडीतील वाढत्या जलप्रदूषणाविषयी फारसे बोलले जात नाही. खाडी भागांत आता मासेच उरले नसल्याची खंत वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे सदस्य नंदकुमार पवार यांनी व्यक्त केली.

आम्ही फेब्रुवारी महिन्यात ठाणे खाडी परिसरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली. या पाण्यांच्या नमुन्यांत ७८ प्रती मिलीलीटर ऑक्सिजन नाहीसा झाला आहे. ३० प्रती मिलीलीटर ऑक्सिजनचे प्रमाण असल्यास मासे पाण्यात जगतात. परिणामी, या खाडीत मासे जगूच शकत नाहीत. वाढत्या जलप्रदूषणात केवळ कॅट फिश हा मासा पावसाळ्यात आम्हाला दिसून येतो. उर्वरित मासे ठाणे खाडी परिसरातून गायब झाल्याची माहिती नंदुकमार पवार यांनी दिली. पाण्यात ऑक्सिजनची कमतरता वाढत्या जलप्रदूषणामुळे आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदशनशील क्षेत्राजवळ तीन डम्पिंग ग्राऊण्ड असणे नियमबाह्य असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

रामसर क्षेत्र जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांसाठी दर्जेदार जैवविविधता आवश्यक असते. केवळ फ्लेमिंगो अभयारण्यातील वीस हजार पक्ष्यांचे थवे पुरावा म्हणून दाखवणे योग्य नाही. जलप्रदूषणावरही उपाय शोधायला हवा. ठाणे खाडीतील सजीव जीवसृष्टी धोक्यात आल्याचा इशाराही त्यांनी दिला. ठाणे खाडीतील वाढत्या जलप्रदूषणाविषयी माहिती घेण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

रामसर क्षेत्र म्हणजे काय

आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणदृष्ट्या महत्त्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र म्हणून दर्जा दिला जातो. १९७१ साली इराण येथील रामसर शहरात रामसर परिषद पार पडली. जगभरातील विविध जागी वसलेल्या पाणथळ जागांचे संवर्धन करण्याचा निर्णय रामसर परिषदेत घेतला गेला. या निर्णयानुसार प्रत्येक देशाने आपल्या भौगोलिक प्रदेशातील जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी त्या जागेला रामसर क्षेत्र घोषित करण्याचा ठराव पास झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.