ठाणेकरांनो… 31st ची पार्टी करताय? पालिकेची राहणार नजर

88

कोव्हीड १९ चा वाढता संसर्ग आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने भरारी पथकांची निर्मिती करून या पथकांच्या मार्फत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. दरम्यान येऊरसाठी स्वतंत्र भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांनी सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेवून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्तांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हुल्लडबाजी करणाऱ्यावर पालिकेची करडी नजर

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दुकाने रात्री ११.०० तर हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शहरातील दुकाने व हॉटेल्स दिलेल्या वेळेनंतर खुली राहणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी विशेष भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या वेळेनंतर सुरु असणाऱ्या दुकाने व हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

(हेही वाचा – …तर भाजपा खटला दाखल करणार, फडणवीसांचा इशारा)

…तर कडक कारवाई होणार

तसेच शहरातील मोकळ्या जागी तसेच सार्वजनिक ठिकाणीही या पथकांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. यासोबतच प्रमुख ठिकाणी, मार्केट परिसर आदी ठिकणी रात्री ९ नंतर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. शहरात विनाकारण घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आज रात्री पासूनच या भरारी पथकांमार्फत विविध ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांची संख्या असल्यास संबंधित आस्थापनेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.