८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक अद्भूत साहस केले. ७ जुलैला रात्री मोरिया बोट मार्सेलिसच्या बंदरात दाखल झाली. किनारा साधारण १५० फूट दूर होता. सावरकरांच्या मनाचा निश्चय केव्हाच झाला होता. त्यांना आता ८ जुलैच्या सकाळची वाट पाहायची होती. सकाळ झाली, ते वेळ न दवडता शौचकुपाकडे आले. आत गेल्यावर त्यांनी दार लावून घेतले आणि अंगावरचा गाऊन आरशावर टाकला. त्यामुळे आतलं दृश्य बाहेर असलेल्या पहारेकर्यांना दिसलं नाही. मग सावरकर पोर्टहोलमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागले. पोर्टहोलमधून शरीर बाहेर काढणं अतिशय कठीण काम होतं. त्यांची कातडी सोलून निघत होती. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या, पण त्याहीपेक्षा त्यांना चिंता सतावत होती की जर आपल्याला उशीर झाला तर खूप मोठी समस्या निर्माण होईल.
अखेर त्यांना यश मिळालं आणि त्यांनी समुद्रात उडी घेतली. हा प्रकार लक्षात आल्यावर बोटीचा क्वार्टर मास्टर आणि एका पहारेकर्यानेदेखील समुद्रात उडी घेतली. सावरकरांनी अखेर मार्सेलिसचा किनारा गाठला. ते धावू लागले आणि आपले सहकारी दिसतात का ते पाहू लागले. पण कुणीच दिसलं नाही म्हणून त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या फ्रेंच पोलिसाला मॅजेस्ट्रिटकडे घेऊन जायला सांगितले. पण मागून पाठलाग करणारे ते दोघं तिथे पोहोचले आणि फ्रेंच पोलिसाला लाच देऊन सावरकरांना पुन्हा बोटीवर घेऊन गेले. बोटीवर आल्यावर त्यातील एका इन्स्पेक्टरने सावरकरांना गुद्दा मारला. तेव्हा सावरकर चिडून म्हणाले की, ’मला मारहाण कराल तर तुमच्यापैकी एकाला तरी सोबत घेऊन जाईन.”
( हेही वाचा: आता जिलेटीन कांड्या-टोळीचा होणार पर्दाफाश; मर्डर केस सीजन २ रसिकांच्या भेटीला )
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या या साहसामुळे इंग्रजांचं खरं रुप जगाला कळालं आणि भारतीय स्वतंत्र्य संग्रामाची चर्चा जागतिक पटलावर होऊ लागली. सावरकरांची अंदमानातून मुक्तता झाल्यानंतरही त्यांनी कधीच हा प्रसंग ओढून ताणून सांगितला नाही. त्यांच्या जागी दुसरा कुणी असता तर या एका पराक्रमाच्या बळावर बक्कळ पैसे कमावले असते किंवा सबंध आयुष्य सुखात जगू शकले असते. आज इतक्या वर्षांनंतर आपण साहस दिन म्हणून हा दिवस साजरा करतो. हा दिवस साजरा करताना आपली मानसिकता नेमकी कशी आहे हे तपासून पाहावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या आणि ममता दिदीची सत्ता पुन्हा स्थापन झाली. फाळणी आणि फाळणीपूर्व दंगलीचा फटका बंगालला बसला होता. तरीदेखील तिथले बहुसंख्य हिंदू जागे झाले नाहीत. आज देशात हिंदूभावविश्वाचं वातावरण निर्माण व्हायला ७० हून अधिक वर्षे लागली. याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे.
स्वातंत्र्यवीरांनी जे साहस केलं, त्याची जाणीव आपल्याला आहे का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आपण हिंदू म्हणून जगतो आहोत का? आपल्या देशाचं भविष्य तेव्हाच चांगलं होणार आहे, जेव्हा देशाचं भावविश्व हिंदू राहिल आणि भावविश्व हिंदू राहण्यासाठी घराघरात आणि मनामनात शिवाजी-सावरकर हा मंत्र पोहोचला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा तरी दिला पाहिजे. भविष्यात फाळणीसदृश वातावरण निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्या मुलांवर देशभक्तीचे संस्कार केले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना देखील ते शिकवलं पाहिजे. स्वातंत्र्यवीरांचे साहस हे या दृष्टीकोनातून अत्यंत मोलाचे आहे.
Join Our WhatsApp Community