अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांनी कुटूंबीयांसह नुकत्याच गेट वे ऑफ इंडियाजवळ दिसल्या. जेट्टीसह प्रवास करणा-या शेट्टी बहिणी प्रवासादरम्यान सी गल पक्ष्यांना चिप्स देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बहिणींच्या विरोधात पक्षीप्रेमी थेट वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे धावले.
शेट्टी कुटूंबीयांना प्रसारमाध्यमांनीही घेरले
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या धाकट्या मुलीचा १५ फेब्रुवारीला वाढदिवस होता. आपल्या चिमुकलीचा दुसरा वाढदिवस थाटामाटात करण्यासाठी शिल्पा कुटूंबीयांसह एकदिवस अगोदर अलिबागला पोहोचली. त्यावेळी गेट वे ऑफ इंडियाजवळ खासगी जेट्टी पकडण्यासाठी आलेल्या शेट्टी कुटूंबीयांना प्रसारमाध्यमांनीही घेरले. शिल्पा अगदी प्रेमाने सर्वांना सांभाळत दोन्ही मुलांसह, पती राज कुंद्रा, आई सुनंदा शेट्टी, बहिण शिल्पा शेट्टी आणि तिचा प्रियकर राकेश बापट याच्यासह खासगी जेट्टीमध्ये शिरली.
प्राणीप्रेमी संस्थेने शेट्टीबहिणींविरोधात घेतला आक्षेप
मुंबई व नजीकच्या किना-याला हमखास दिसणा-या सीगल या समुद्री वन्यपक्ष्यांना त्यांनी चिप्सही खायला घातले. त्याचा व्हिडिओ शेट्टी बहिणींच्या इन्स्टाग्रामवर पोस्टही झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेने शेट्टीबहिणींविरोधात आक्षेप घेतला. थेट वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे तक्रारही नोंदवली. मात्र शेट्टीबहिणींनी नंतर हा व्हिडिओ काढून टाकला.
सीगल्स या सागरी वन्यपक्ष्यांना चिप्ससारखे तत्सम पदार्थ भरवणे चुकीचे आहे. अभिनेत्री असल्याकारणाने दोघींनी चुकीच्या गोष्टींना समर्थन करु नये. त्यांचा चाहतावर्गही सीगल्स पक्ष्यांना चिप्स घालण्याचा प्रकार पुन्हा करेल. या प्रकरणी वनविभाच्या कांदळवन कक्षाने योग्य ती कारवाई करावी, मानद वन्यजीव रक्षक (ठाणे) रॉचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Communityआम्ही सातत्याने सीगल्स पक्ष्यांना चिप्ससारखे तत्सम पदार्थ खायला देऊ नका, याबाबत जनजागृती करत आहोत. सेलिब्रिटींनी सर्वांसमोर सीगल्स पक्ष्यांना चिप्ससारखे पदार्थ खाऊ घालणे चुकीचे आहे. समाजमाध्यमांवर अशा पद्धतीचे व्हिडिओज टाकून चुकीचा संदेश पसरण्याची भीती असते.
– वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, वनविभाग